कमी वयात यशाचं शिखर गाठणाऱ्या मधुबालांचे शेवटचे दिवस होते अत्यंत वेदनादायी
कमी वयात यशाचं शिखर गाठणाऱ्या मधुबालांचे शेवटचे दिवस होते अत्यंत वेदनादायी
हिंदी चित्रपटसृष्टीतील 50 च्या दशकातील सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री मधुबाला (Madhubala)यांचं नाव आजही अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतं. मात्र, मधुबाला यांनी आपल्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिलं आहे, हे आपल्याला माहिती आहे का?
मुंबई 14 फेब्रुवारी : हिंदी चित्रपटसृष्टीतील 50 च्या दशकातील सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री मधुबाला (Madhubala)यांचं नाव आजही अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतं. व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine's Day) दिवशी जन्मलेल्या मधुबालाला यांना प्रेमाचं दुसरं नावं म्हटलं, तरी चुकीचं ठरणार नाही. आपल्या कामामुळे मधुबाला जितक्या चर्चेत राहिल्या तितकंच अनेक विवादांमध्येही त्यांचं नाव जोडलं गेलं. मधुबाला यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1933 रोजी दिल्लीमध्ये अताउल्लाह खान आणि आयशा बेगम यांच्या घरी झाला. 11 भावंडांमध्ये मधुबाला पाचव्या नंबरच्या होत्या. घराची जबाबदारी असल्यानं त्यांनी लहान वयातच कामाला सुरूवात केली होती.
1942 मध्ये बसंत या सिनेमातून त्यांनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात केली. 9 वर्ष वयातच त्यांनी बेबी मुमताज असं नाव दिलं गेलं. याच काळात मधुबाला यांची मैत्री बेबी मेहजबीं म्हणजेच मीना कुमारी यांच्यासोबत झाली. मधुबाला यांनी नील कमल या सिनेमातून मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मधुबाला यांची सुंदरता आणि लोकप्रियता पाहून ऑस्कर अॅवॉर्ड विजेते दिग्दर्शक फ्रैंक कापरा यांनी मधबुालाला हॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा विचार केला. मात्र, मधुबालानं यासाठी नकार दिला. मधुबाला यांचं फिल्मी करिअर जितकं यशस्वी होतं, तितक्याच अडचणींचा सामना त्यांना वैयक्तिक आयुष्यात करावा लागला.
मधुबाला यांचं नाव दिग्दर्शक कमाल अमरोही आणि दिलीप कुमार यांच्यासोबत जोडलं गेलं. मधुबालानं 1949मध्ये कमाल अमरोही यांच्या महल सिनेमात काम केलं होतं, हा सिनेमा त्यांच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरला होता. याच दरम्यान दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, कमाल आधीपासूनच विवाहित होते आणि पुढं त्यांचं दोघांचं नातंही तुटलं. यानंतर 1951 मध्ये तराना सिनेमाच्या सेटवर मधुबाला आणि दिलीप कुमार यांची भेट झाली. दोघंही बहुचर्चित मुगल ए आजम सिनेमात सोबत झळकले होते. मात्र, हे नातंदेखील मध्येच संपलं. 1956 मध्ये मधुबालाची भेट किशोर कुमार यांच्यासोबत झाली आणि 1960 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.
मधुबाला यांच्या हृदयात छेद असण्यासोबतच त्यांना फुफ्फुसाचा आजारही होता. याशिवाय त्यांना आणखी एक गंभीर आजारही होता. यात त्यांच्या शरीरामध्ये गरजेपेक्षा जास्त रक्त तयार होत असे आणि हे रक्त नाकाच्या तसंच तोंडाच्या माध्यमातून बाहेर येत असे. मधुबाला तब्बल 9 वर्ष केवळ बेडवर पडून होत्या आणि या आजाराशी झुंज देत होत्या. शेवटी 23 फेब्रुवारी 1969 ला 36 वर्षाच्या मधुबाला यांनी जगाचा निरोप घेतला.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.