मुंबई,26 मार्च- प्रतिनिधी-सुरेश जाधव: सध्या राज्यभरात अनेक ग्रामीण भागात यात्रांना सुरुवात झाली आहे. यात्रा-जत्रा म्हणजे गावकऱ्यांसाठी एक प्रकारची मनोरंजनाची मेजवानीच असते. यात्रा-जत्रांमध्ये जसा पाहुणे आणि खानपानाचा बेत असतो. त्याचप्रमाणे विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि लावणीच्या कार्यक्रमांचा आवर्जून समावेश असतो. सध्या अशा कार्यक्रमांमध्ये नृत्य करण्यासाठी एका नावाला चांगलीच पसंती मिळत आहे. आणि ते नाव म्हणजे गौतमी पाटील होय.
गौतमी पाटीलला जितकी लोकप्रियता मिळत आहे तितकीच ती वादातही अडकत आहे. गौतमी पाटीलवर सतत टीका-टिप्पणी होत असते. कधी गौतमी स्वतः आपल्या अश्लील हावभावांमुळे अडचणीत येते. तर कधी तरुण तिच्या कार्यक्रमात राडा घालत वाद निर्माण करतात. दरम्यान आता प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटीलचं नाव न घेता, नकळतपणे समाजाच्या बदलत्या मानसिकतेला टोला लगावला आहे.
नुकतंच आष्टी तालुक्यातील तवलवाडी याठिकाणी इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात इंदुरीकरांनी आपल्या नेहमीच्या मजेशीर अंदाजात अनेक गोष्टींवर भाष्य केलं. दरम्यान त्यांनी गौतमी पाटीलच्या नावाचा उल्लेख न करता तिच्यावर निशाणा साधला आहे. गौतमीचं नाव न घेता त्यांनी रोष व्यक्त केला आहे.
गौतमी पाटीलच्या तीन गाण्याला तीन लाख, आणि आम्ही किर्तनासाठी पाच हजार मागितले, तरी आमच्यावर पैशांचा बाजार मांडल्याचा घणाघात होतो- कीर्तनकार इंदुरीकर महाराज pic.twitter.com/aJnHKwxPhW
— News18Lokmat (@News18lokmat) March 26, 2023
यावेळी बोलताना इंदुरीकर महाराजांनी म्हटलं, तिने तीन गाणी वाजवून तीन लाख घेतले, आणि आम्ही आमच्या कीर्तनासाठी पाच हजार जरी मागितले तरी लोक म्हणतात त्यांचं काय खरं आहे, पैशांचा बाजार मांडलाय नुसता..' तिच्या कार्यक्रमात राडा-वाद होऊनही असं, आणि आम्ही टाळ वाजवूनही आम्हाला काहीच मिळत नाही. असंही त्यांनी म्हटलंय'. असं म्हणत इंदुरीकरांनी टोला लगावला आहे.
गौतमी पाटील सध्या चांगलीच चर्चेत असते. तिला विविध ठिकाणी गडगंज रुपयांची सुपारी देऊन कार्यक्रमासाठी बोलावलं जातं. नुकतंच एका कार्यक्रमासाठी गौतमी पोहोचली होती. तिने मोठी रक्कमसुद्धा घेतली होती. कार्यक्रमसुद्धा सुरु झाला. मात्र काही तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे राडा व्हायच्या आधी खबरदारी घेत पोलिसांनी हा कार्यक्रम थांबवला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Gautami Patil