मुंबई, 22 ऑक्टोबर: कोरोना (corona) मुळे सध्या सारं जग हैराण झालं आहे. सामान्य लोकं तर सोडाच पण सेलिब्रिटीही कोरोनामुळे त्रस्त झाले आहेत. बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींना, त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाने ग्रासलं आहे. अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) च्या आईला कोरोना झाला आहे. पिंकी रोशन (Pinkie Roshan) यांच्या वाढदिवसालाच त्या कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. पिंकी रोशन यांनी लवकरच बरं होण्याची आशा व्यक्त केली.
पिंकी रोशन यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जोरदार तयारी चालू होती. पिंकी रोशन यांना कोरोना झाला आहे. हे रोशन कुटुंबाला माहित होतं. त्या सेल्फ आयसोलेटेड आहेत याबद्दलही त्यांना माहिती होती. पण तरीही रोशन कुटुंबाने पिंकी रोशन यांना एकटं पाडू दिलं नाही.
रोशन कुटुंब आणि त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची दर 20 दिवसांनी कोरोना चाचणी होते. अशी माहिती पिंकी रोशन यांनी दिली. साधारण एक आठवडा आधीच त्यांची कोरोना चाचणी झाली होती. ती पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाबद्दल माहिती देताना पिंकी रोशन म्हणाल्या, "माझ्या शरीरामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. नियमित योग आणि व्यायाम केला तर कोरोना लवकर आटोक्यात येईल असा सल्ला मला डॉक्टरांनी दिली आहे. मला आशा आहे की लवकरच माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह येईल."
पिंकी रोशन यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहलं आहे, घराच्या दरवाजावरच माझ्या कुटुंबाने मला वाढदिवसाचं सरप्राइज दिलं आणि मला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या". पिंकी रोशन यांचा 68 वा वाढदिवस आहे. त्यात हा आयसोलेशनमध्ये साजरा झालेला वाढदिवस त्यांच्यासाठी खूपच खास ठरला.