मुंबई, 23 ऑक्टोबर : अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित सिनेमा 'लक्ष्मी बाँब' (Laksmi Bomb) वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसत आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतरच सोशल मीडियावर याबाबत वादंग उठला होता. लक्ष्मी बाँब या नावावरून अनेकांना आक्षेप आहे. तर काहींनी यातील कंटेटवर देखील आक्षेप घेतला आहे. देशभरातील विविध संघटना अक्षयच्या या मोस्ट अवेटेड सिनेमाला विरोध करत आहेत. काहींनी हा सिनेमा प्रदर्शित करू नये अशी मागणी केली आहे. धार्मिक भावनांना यातून ठेच पोहोचत असल्याचे या संस्थांचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय हिंदू सेना आता या सिनेमाविरोधात मोर्चा काढणार असल्याची देखील माहिती समोर येते आहे. या संस्थेकडून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिण्यात आले आहे. यामध्ये सिनेमा बॅन करण्याची मागणी केली गेली आहे. या सिनेमाचे नाव न बदलल्यास हिंदू सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता विरोध प्रदर्शन करेल असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी ट्वीटरवर असे म्हटले आहे की, या नावात हिंदू देवतेचा अपमान झाला आहे.
Hindu Sena has given a complaint letter @PrakashJavdekar to take appropriate action against the promoters, cast and crew of the upcoming movie "Laxmmi Bomb" starring @akshaykumar and directed by Sh Raghava Lawrence for making mockery of Hindu Goddess Laxmi's name, @ANIpic.twitter.com/5UjVfXBNJB
.@akshaykumar को हिन्दू सेना की चेतावनी फिल्म लक्ष्मी बम से माँ लक्ष्मी पवित्र शब्द हटाएं "नही तो "तुम्हारी सभी फिल्म का बहिष्कार करेंगे, व फिल्म को किसी भी कीमत पर रिलीज नहीं होने देंगे, इसके लिए हमे चाहे कोर्ट जाना पड़े या फिर सडकों पर उतना पड़े! @offl_Lawrence
हिंदू समुदायाच्या भावना यातून दुखावल्या गेल्याने त्यांनी जावडेकरांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. लक्ष्मी देवीच्या नावापुढे 'बाँब' या शब्दाचा वापर योग्य नाही, ज्या देवीची आम्ही पूजा करतो तिच्या नावापुढे बाँब शब्द लागणे निंदनीय आहे, असेही या पत्रात म्हटले आहे. आणखी एक मुद्दा या पत्रात मांडण्यात आला आहे. तो म्हणजे हिंदू सेनेच्या मते हा सिनेमा 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन देत आहे. सिनेमामध्ये हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा यांच्यामध्ये प्रेमाचे नाते दाखवले आहे. अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी या भूमिकांमध्ये असणार आहेत.
अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी स्टारर 'लक्ष्मी बाँब' 9 नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. युट्यूबवर या सिनेमाचा ट्रेलर गेले अनेक दिवस ट्रेंड होत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या सिनेमाला विरोध होत असला तरीही अक्षय-कियाराच्या चाहत्यांनी यामध्ये काहीच वावगं नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे काही प्रमाणात सोशल मीडियावर यावर वाद सुरू आहे. त्याचप्रमाणे या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.