'वह हमारी बेटी है', हिमाचल सरकार पुरवणार कंगनाला पोलीस सुरक्षा

'वह हमारी बेटी है', हिमाचल सरकार पुरवणार कंगनाला पोलीस सुरक्षा

'कंगनाच्या मुंबई दौऱ्याबाबतही सुरक्षा पुरविण्याबाबत पोलीस निर्णय घेणार आहेत.'

  • Share this:

शिमला 6 सप्टेंबर: अभिनेत्री कंगना रणौतच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाने वेगळं वळण घेतलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि इतर सर्व पक्षांनी कंगनावर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेने तर कंगना विरुद्ध जोडे मारा आंदोलन केलं. अनेक नेत्यांनी कंगना विरुद्ध जहाल भाषाही वापरली होती. आता या वादानंतर हिमाचल प्रदेश सरकारने कंगनाला सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतलाय.

हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी हे आदेश दिलेत. कंगना ही हिमाचलची मुलगी आहे. वह हमारी बेटी है, असं म्हणत तिच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी आमची आहे असंही ठाकूर म्हणाले. कंगनानेही सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती.

ठाकूर म्हणाले, कंगनाच्या वडिलांनी पोलिसांकडे सुरक्षेसाठीचा अर्ज केला आहे. कंगनाच्या बहिणीनेही मला फोन करून सुरक्षा देण्याची विनंती केली होती त्यामुळे मी पोलीस महासंचालकांना सुरक्षा देण्याचे निर्देश दिल्याचं त्यांनी सांगितलं.

9 सप्टेंबरला मुंबईत येण्याचं कंगना रणौतने जाहीर केलं होतं. त्यामुळे तिच्या या दौऱ्यालाही सुरक्षा व्यवस्था पुरविण्याबाबत पोलीस निर्णय घेतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त भागाशी केल्यामुळे वाद पेटला आहे. शिवसेनेनं राज्यभरात कंगनाच्या विरोधात जोरदार आंदोलन केले आहे. पण, आता जर कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर विचार करू अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना कंगना राणावतला महाराष्ट्राची माफी मागावी असे मागणी केली आहे. जर कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर माफ करण्याबद्दल विचार करू, असं राऊत म्हणाले.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 6, 2020, 11:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading