मुंबई, 24जुलै: इंदू सरकार या हिंदी चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यात यावं, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. प्रिया सिंग पॉल यांनी ही याचिका दाखल केली होती. प्रिया सिंग पॉल यांनी संजय गांधी हे आपले नैसर्गिक पिता होते असा दावा कोर्टात केला.
सिनेमाच्या ट्रेलरमधे संजय गांधी यांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद असून त्या संवादांना सत्याचा कोणताही आधार नाही असं पॉल यांचे म्हणणं होतं. या ट्रेलरमध्ये संजय गांधी बलात्कारी आहेत असं दाखवण्यात आलं असून त्यामुळे संजय गांधी यांची बदनामी होत असल्याचंही पॉल यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं. आपण संजय गांधी यांची नैसर्गिक कन्या असून ते आपण कालांतरानं सिद्ध करु पण तोपर्यंत खूप उशीर झाला असेल आणि हा चित्रपट प्रदर्शित झाला असेल त्यावेळेस काहीच करता येणार नाही असं पॉल यांचं म्हणणं होतं. चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर हे हा चित्रपट ३० सत्य आणि ७० टक्के कल्पनेवर आधारित आहे असं म्हणतात पण मग सर्वसामान्य प्रेक्षकांनी कोणता भाग सत्य आणि कोणता भाग काल्पनिक हे कळणार नाही असा पॉल यांचा युक्तीवाद होता. तसंच इंदिरा गांधी या राष्ट्रीय आयकॉन होत्या, त्यांच्या अफाट कर्तृत्वाला असा सिनेमा गालबोट लावेल असंही पॉल यांचं म्हणणं होतं.
पण, कोर्टाने मात्र या सिनेमाला सीबीएफसीने प्रमाणपत्र दिलं असल्यामुळे या सिनेमाचं प्रदर्शन रोखण्यास नकार दिला. तसंच प्रिया पॉल या संजय गांधी यांची नैसर्गिक कन्या आहे हेही अजून सिद्ध व्हायचं आहे असंही हायकोर्टाने नमूद केलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा