बॉलिवूडच्या प्रस्थापित वर्चस्वाला सुरुंग लावणारे हे आहेत 11 नवे स्टार

बॉलिवूडच्या प्रस्थापित वर्चस्वाला सुरुंग लावणारे हे आहेत 11 नवे स्टार

अनेक कलाकारांची नावं यंदा चर्चेत आहेत आणि त्या कलाकारांना कोणतीही मोठी पार्श्वभूमी नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 डिसेंबर : अनेक दिग्गज कलाकारांची बॉलिवूडमध्ये चलती आहे. त्यामुळे कायम त्यांचीच चर्चा असते. 2020 हे वर्ष मात्र त्याला काहीसं अपवाद आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या उदयामुळे या चित्रात काहीसा फरक झाला आहे. या माध्यमातल्या वेबसीरिज आणि फिल्म्समधल्या अनेक कलाकारांची नावं यंदा चर्चेत आहेत आणि त्या कलाकारांना कोणतीही मोठी पार्श्वभूमी नाही. अशा 11 कलाकारांची ही माहिती, ज्यांची नावं यंदा चर्चेत होती.

प्रतीक गांधी (Prateik Gandhi)

हंसल मेहताने दिग्दर्शित केलेल्या 'स्कॅम 1992 : दी हर्षद मेहता स्टोरी' (Scam 1992) या वेबसीरिजमुळे प्रतीक गांधी हा एक नवा चेहरा हिंदी मनोरंजन क्षेत्राला मिळाला आहे. या सीरिजमुळे त्याच्या करिअरचा आलेख उंचावला आहे. गुजराती नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटवत असतानाच प्रतीकला या वेबसीरिजची संधी मिळाली आणि 2020 हे वर्ष आपल्यासाठी सगळ्या बाजूंनी गेमचेंजर ठरलं असं त्यानं सांगितलं. 'या वर्षाने माझ्या आयुष्यात अगदी मोठा बदल झाला आणि हे वर्ष माझ्यासाठी जणू 'स्कॅमडॅमिक' ठरलं. या सीरिजमुळे मला अनेक गोष्टी मिळाल्या आणि हे सगळं माझ्याभोवती खरंच घडतं आहे, ही गोष्ट माझ्या अजून पचनी पडत नाही. वैयक्तिक पातळीवरही मला 2020 या वर्षाने अनेक गोष्टी शिकवल्या. माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा मैलाचा दगड म्हणून 2020 हे वर्ष माझ्या कायम स्मरणात राहील,' असं त्यानं आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितलं.

जितेंद्र कुमार (Jitendra Kumar)

व्हायरल फीव्हर स्केचेस (Viral Fever Sketches) या कार्यक्रमामुळे जितेंद्र कुमारला त्याचा असा एक चाहतावर्ग होता; पण 2020 हे वर्ष गेमचेंजर ठरलं. फेब्रुवारीत रिलीज झालेल्या 'शुभमंगल जादा सावधान' या चित्रपटात आयुष्मान खुरानाचा ऑन स्क्रीन गे-लव्हर म्हणून त्याने भूमिका निभावली होती; मात्र पंचायत या नावाच्या उपरोधिक वेबसीरिजमुळे त्याचं नाव घराघरात पोहोचलं. एका मोठ्या शहरातला मुलगा एका दुर्गम गावाच्या पंचायतीचा सचिव होतो, अशी भूमिका त्यानं त्यात रंगवली होती. चमन बहार नावाच्या डिजिटली रिलीज झालेल्या चित्रपटातही जितेंद्र कुमार होता.

जितेंद्रने आयएएनएसला सांगितलं, की चित्रपट जगतात झालेल्या बदलाचा मी एक भाग आहे. या वर्षाने मला खूप काही दिलं. मला खूप वैविध्यपूर्ण कथांवर प्रयोग करता आले. लोकांना असा कंटेंट देण्यात मजा आली, की जो इतका हिट होईल याची त्यांना किंवा मलाही कल्पना नव्हती. शुभमंगल जादा सावधान, पंचायत किंवा चमन बहार या सगळ्या प्रकल्पांमध्ये मला मजा आली. तसंच प्रत्येकाकडून माझं कौतुक झालं. त्यामुळे चित्रपट जगताच्या बदलाचा मी भाग आहे असं मी म्हणू शकतो आणि हा बदल कायम लक्षात ठेवला जाईल, असंही जितेंद्रने सांगितलं.

मानवी गगरू (Manvi Gagroo)

शुभमंगल जादा सावधान (Shubh Mangal Zyada Savdhan) या चित्रपटात मानवीने केलेली गॉगल (Goghle) ही भूमिका लोकांना आवडली; पण 'फोर मोअर शॉट्स प्लीज'च्या दुसऱ्या सीझनमधल्या तिने साकारलेल्या सिद्धीच्या भूमिकेमुळे तिला बरेच चाहते मिळाले आणि तिचं अभिनयकौशल्य प्रकाशझोतात आलं.

'शुभमंगल जादा सावधानमधल्या गॉगल या माझ्या भूमिकेला मिळालेल्या लोकांच्या प्रतिसादामुळे माझ्या वर्षाची सुरुवात चांगली झाली होती. ते एक प्रकारे गेमचेंजरच होतं. 'फोर मोअर शॉट्स प्लीज'चा दुसरा सीझन एप्रिलमध्ये, लॉकडाउनच्या सुरुवातीलाच आला, जेव्हा लोक 'न्यू नॉर्मल' पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करू लागले होते,' असं मानवी म्हणाली.

सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi)

गेल्या वर्षी आलेल्या गली बॉयमधल्या (Gully Boy) एमसी शेर या भूमिकेनं सिद्धांतला प्रसिद्धी मिळाली असेल, तर ते यश तो यंदा साजरं करतो आहे. दीपिका पदुकोन आणि अनन्या पांडे यांच्यासह अद्याप नाव न ठरलेल्या एका चित्रपटात हिरोची भूमिका त्याने स्वीकारली आहे. कतरीना कैफसोबत फोन भूत या हॉरर कॉमेडीत तो आहे. तसंच 'बंटी और बबली टू'मध्ये राणी मुखर्जी आणि सैफ अली खानसोबत तो आहे.

या वर्षी तो गायकही बनला. त्यानं गायलेलं धूप (Dhoop) हे गाणं लॉकडाउन कालावधीत चार जूनला यू-ट्यूबवर प्रसिद्ध झालं आणि आजच्या घडीला त्याला दोन लाख 82 हजार 263 व्ह्यूज मिळाले आहेत.

विद्युत जमवाल (Viduyt Jamwal)

तो बायसेप्स दाखवण्याशिवाय आणि अॅक्शनपटांशिवाय काही करू शकणार नाही, असं सगळ्यांना वाटत होतं; 2020मध्ये त्याने तेच केलं. खुदा हाफिझ (Khuda Hafiz) या डिजिटली रिलीज झालेल्या अॅक्शनपटामध्ये अभिनय आणि नाट्यालाही वाव होता आणि त्याने केलेल्या अभिनयाने लोकांना इम्प्रेस करण्यात तो यशस्वी झाला. त्या फिल्मचा सिक्वेल आता येणार आहे.

खुदा हाफिजचा दिग्दर्शक फारुक कबीरने आयएएनएसला सांगितलं, की केवळ अॅक्शनपटातला कलाकार इथपासून चांगला अभिनेता म्हणून विद्युतमध्ये झालेला बदल खुदा हाफिझमध्ये यंदा दिसला आहे आणि तो कौतुकास्पद आहे. त्या भूमिकेसाठी त्याने खूप कष्ट घेतले आहेत. या वर्षातल्या उत्तम परफॉर्मन्सेसमध्ये त्याच्या नावाची चर्चा आहे ही चांगली गोष्ट आहे. कारण यंदा त्याने रसिकांना खरंच सरप्राइज दिलं आहे.

इश्वाक सिंग (Ishwak Singh)

वीरे दी वेडिंग, तुम बिन टू यांसारख्या काही चित्रपटांमध्ये तो दिसला होता; पण हिंदी चित्रपटरसिकांच्या तोंडात त्याचं नाव बसलं ते 2020मध्ये. पाताल लोक (Patal Lok) या वेबसीरिजमध्ये त्याने इम्रान अन्सारी या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका रंगवली. त्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.

इश्वाकने सांगितलं, 'अत्यंत दुखावणाऱ्या आणि अत्यंत कठीण काळात हे सगळं आव्हानात्मक होतं, पण ते उल्लेखनीय होतं. याच वर्षानं मला ओळख दिली. माझ्या कौशल्यांसाठी मी आता ओळखला जातो. 2020नंतर लोक माझी दखल घेऊ लागले. ही समाधानकारक गोष्ट आहे.'

कुणाल खेमू (Kunal Khemu)

कुणाल खेमू बालकलाकार म्हणूनही म्हणजे अगदी लहानपणापासून बॉलिवूडमध्ये काम करतोय. तेव्हापासून तो प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जात असला, तरी तो 'अंडरडॉग'च होता. यंदा त्याने मलंगमध्ये (Malang) एका मनोरुग्ण पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली. मोहित सुरीच्या या चित्रपटातल्या भूमिकेत कुणालने त्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतल्या शेड्स उत्तम मिलाफ केला. लूटकेस या कॉमेडी फिल्मसाठीही त्याचं कौतुक झालं. साक्षात अमिताभ बच्चननीही त्याचं यासाठी कौतुकाचं पत्र लिहिलं. अभय या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनमधल्या त्याच्या भूमिकेचीही चर्चा झाली.

2020 हे आपल्यासाठी उत्साहवर्धक वर्ष ठरलं, असं कुणालने आयएएनएसला सांगितलं. वेगवेगळ्या जॉनर्समधले वैविध्यपूर्ण रोल्स साकारण्याची संधी मला मिळाली. मलंग, लूटकेस (Lootcase) आणि अभय (Abhay) या सगळ्या प्रोजेक्टमधल्या माझ्या कामाचं कौतुक झालं. हे वर्ष गेमचेंजर आहे की नाही हे इतक्यात सांगता येणार नाही; पण या वर्षामुळे खेळात रंगत आली एवढं नक्की, असं कुणाल म्हणाला.

शरद केळकर (Sharad Kelkar)

लक्ष्मी या चित्रपटात शरद केळकरने किन्नराची भूमिका केली होती. अक्षय कुमारच्या भूमिकेपेक्षा त्याची चर्चा जास्त झाली. तान्हाजी - द अनसंग वॉरियर (Tanhaji - The unsung Warrior) या चित्रपटातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतही त्यानं सर्वस्व ओतलं होतं.

तो म्हणाला, 'छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळणं हे भाग्य असतं आणि लोकांनी ती भूमिका आवडली, याबद्दल मी कृतज्ञ आहे. तो चित्रपट यशस्वी झाल्यामुळे या वर्षाची सुरुवात उत्तम झाली. त्यानंतर स्पेशल ऑप्स आणि लक्ष्मी हे दोन्ही प्रोजेक्ट्स खास होते आणि दोन्हींतल्या माझ्या भूमिकांचं कौतुक झालं, याचा मला आनंद आहे. ब्लॅक विडोज या प्रोजेक्टद्वारे या वर्षाची अखेर होत आहे. माझ्या मते केवळ एक वर्ष नव्हे, तर माझ्या गेल्या 18 वर्षांचे कष्ट आणि प्रवासानंतर मला आता फळं मिळायला सुरुवात झाली आहे.'

दिव्येंदू (Divyendu)

मिर्झापूर टूमधला (Mirzapur 2) मुन्ना भय्या आणि बिच्छू का खेलमधला अखिल या त्याच्या दोन भूमिकांची मोठी चर्चा झाली.

'महामारीमुळे हे वर्ष आव्हानात्मक होतं; पण अशा उत्तम कथानकांमध्ये मला सहभाग घेता आलं हे माझं भाग्य. मी यंदा साकारलेल्या तिन्ही भूमिकांचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून स्वागत झालं. आता वर्ष संपताना मी तो प्रत्येक क्षण पुन्हा जगतो आहे. 2020 हे उत्साहवर्धक कंटेंटचं वर्ष होतं,' असं तो म्हणाला.

आहना कुम्रा (Aahana Kumra)

'मर्झी'द्वारे तिने या वर्षाची सुरुवात केली. त्यानंतर 'बेताल'साठी ती झोंबी झाली. रोहित सिप्पीच्या 'सँडविच्ड फॉरेव्हर' या प्रोजेक्टने ती वर्षाची अखेर करत आहे.

2020 हे वर्ष म्हणजे रोलर-कोस्टर राइड होती, असं आहनाला वाटतं.

'लॉकडाउन असल्यामुळे प्रत्येक प्रोजेक्ट रिलीज होताना ज्या गमतीजमती करायला मिळतात, त्यांना मुकावं लागलं; पण यंदा खूप चांगले प्रोजेक्ट रिलीज झाले. सगळं काही OTT वर रिलीज होणार असल्याने मी अजून कोणत्या भूमिका करू शकते, याबद्दल स्वतःचा शोध घेत आहे; पण त्यामुळे प्रयोग करण्याचा माझा आत्मविश्वास वाढतो आहे. एक महिला कलाकार म्हणून मला हे करायला मिळतं आहे, याचा आनंद आहे,' असं आहना म्हणाली.

विजय वर्मा (Vijay Varma)

गेल्या वर्षी गल्ली बॉयमध्ये मोईन ही भूमिका साकारल्यानंतर त्याला चाहतावर्ग मिळाला. मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनमध्ये शत्रुघ्न आणि भरत त्यागी या जुळ्या भावांची भूमिका त्याने साकारली. पुढच्या सीझनमध्येही तो असेलच. तिग्मांशू धुलियाच्या ओटीटीवर रिलीज झालेल्या यारा या चित्रपटातल्या त्याच्या भूमिकेचं, तसंच इम्तियाझ अलीच्या 'शी' या वेबसीरिजमधल्या त्याच्या भूमिकेचंही स्वागत झालं.

'मला असं वाटतं, की मला ओळख मिळाली, त्याच वेळी मला हवा होता तसा कंटेंट मिळाला. हे नक्कीच चांगलं आहे,' असं त्यानं सांगितलं.

Published by: Akshay Shitole
First published: December 24, 2020, 9:04 AM IST

ताज्या बातम्या