मुंबई, 24 जानेवारी: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एक सो एक दमदार सिनेमे तयार होत आहेत. मागचं वर्ष तर मराठी सिनेमांनी गाजवलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मागच्या वर्षात पावनखिंड, चंद्रमुखी, शेर शिवराज, धर्मवीर या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. आता नव्या वर्षात देखील दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यातील एका चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली आहे. तो म्हणजे ‘झिम्मा’ २. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ २ या सिनेमाची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.
‘झिम्मा’ने एक वर्षापूर्वी बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रसिकांना हा चित्रपट आपल्या आयुष्याशी खूप साधर्म्य साधणारा वाटला त्यामुळेच जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले. सिनेरसिकांच्या याच प्रेमामुळे हेमंत ढोमे ‘झिम्मा २’ आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. नुकताच त्याचा एक मजेशीर अनाऊन्समेंट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित करून त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत.
या व्हिडीओत निर्मला म्हणजेच निर्मिती सावंत) पुन्हा एकदा फिरायला जाण्यासाठी साहेबांकडे (अनंत जोग यांच्याकडे) परवानगी मागताना दिसत आहेत. यावेळी साहेबांनीही ट्रीपला येण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यांना नकार देत, पुन्हा एकदा ‘बाया बायाच’ ट्रीपला जायची तयारी करत असल्याचं निर्मला समजावते. साहेब मात्र निर्मलाला सूनबाईंना बरोबर घेऊन जा, असं सांगतात… आता सूनबाई कोण? यावेळी ही ट्रीप कुठे जाणार आणि यात केवळ ‘त्याच’ मैत्रिणी असणार की, आणखी मैत्रिणींची भर पडणार? हे लवकरच कळणार आहे.
View this post on Instagram
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ''झिम्मा’वर प्रेक्षकांशी भरभरून प्रेम केले. यातील प्रत्येकीमध्ये गृहिणींनी, तरुणींनी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला. कधी दोन दिवसही एकट्या घराबाहेर न राहिलेल्या महिलांनी त्यांच्या मैत्रिणींसोबत आठवडाभर बाहेर जाण्याचे प्लॅन्स केले. ‘झिम्मा’ सर्वांनाच खूप जवळचा वाटला. आजही मी कुठे गेल्यावर मला अनेक जणी ‘झिम्मा’ आवडल्याचे आवर्जून सांगतात. अनेकींनी ‘झिम्मा २’ लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन या, अशी मागणीही केली. त्या माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या प्रेमाखातरच मी ‘झिम्मा २’चा निर्णय घेतला आणि आता लवकरच ‘झिम्मा २’ही सीमोल्लंघन करण्यासाठी येणार आहे. या वेळी मजा डबल झाली असून हा चित्रपटही प्रेक्षक तितकाच एन्जॅाय करतील.''
चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित हा चित्रपट येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटात काय नवीन पाहायला मिळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment