'आपल्या काश्मिरी परिवाराला न सांगता मुंबई गाठली आणि...' जुने दिवस आठवून हिना खान झाली भावुक

'आपल्या काश्मिरी परिवाराला न सांगता मुंबई गाठली आणि...' जुने दिवस आठवून हिना खान झाली भावुक

हिना खाननं आता एक अभिनेत्री म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवली असली तरी जुने दिवस तिच्यासाठी नक्कीच सोपे नव्हते.

  • Share this:

मुंबई, 21 डिसेंबर : हिना खान (Hina Khan) ही आजघडीला भारतीय टीव्ही इंडस्ट्रीतली (TV Industry) एक आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. मात्र या मुक्कामावर येण्याआधी तिला बाहेरच्या आघाडीसह घरच्यांशीही मोठाच संघर्ष करावा लागला आहे. हिना खान हिनं नुकत्याच एका पोर्टलवरून आपल्या या संघर्षाबद्दल मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या.

एका कर्मठ काश्मिरी कुटुंबात जन्मलेल्या हीनानं संघर्षाचे दिवस आठवताना मोकळेपणानं सांगितलं, की तिचे पालक दशकरभरापूर्वी तिला दिल्लीला उच्चशिक्षणासाठी पाठवायला तितकेसे राजी नव्हते. आता मात्र कान्स फिल्म फेस्टिवल गाजवत तिनं ओटीटी प्लॅटफॉर्मवरही दणदणीत डेब्यु केला आहे. उमेदीच्या काळात नातेवाईक आणि मित्रांसोबतचे संबंधही विविध कारणांनी तुटल्याचं तिनं सांगितलं.

हिना सांगते की, अभिनयात करियर करणं हा कधीच तिच्यासाठी एक पर्याय नव्हता. तिच्या एका मित्रानं जेव्हा सांगितलं, की एक ऑडिशन देण्याची संधी आहे, ती आधी नकारच देत राहिली. नंतर जेव्हा मनाची तयारी करत तिनं ऑडिशन दिली आणि एका मालिकेत तिला भूमिकाही मिळाली. पण हे पालकांना सांगायला ती धजावली नाही. पुढे ती म्हणाली, "मी पालकांना न सांगताच मुंबईला शिफ्ट झाले. माझं वय तेव्हा होतं फक्त वीस वर्षं. माझे काही नातेवाईक आणि आईच्या मैत्रिणींना माझा हा निर्णय पसंत पडला नाही. वडिल तर माझा हा निर्णय समजल्यावर खूप संतप्त झाले आणि त्यांनी मला ताकीदच दिली. ते म्हणाले, की तुला करियर करायचं असेल तर तू आधी शिक्षण पूर्ण केलं पाहिजेस."

नंतर हिनाला संघर्षाच्या काळात मदत व्हावी म्हणून पालक तिच्यासोबत मुंबईला येऊन राहिले. पण तेव्हाही कौटुंबिक दबाव पुरता नष्ट झाला नव्हता. यासगळ्या काळातच हीनाला तिचं कॅमेऱ्यावर असलेलं प्रेम नीट उमगलं. लवकरच बिग बॉसची संधी तिच्याकडे चालून आली आणि त्यात काम करून तिनं प्रचंड लोकप्रियताही मिळवली. तिच्या सांगण्यानुसार, 'नो शॉर्ट्स, नो स्टिमी सीन्स' अर्थात, कमी कपडे आणि गरम दृश्यांना नकार हे धोरण तिनं काटेकोरपणे पाळलं.

मात्र पुढचं आव्हान होतं, ते बॉयफ्रेंड रॉकीबद्दल आपल्या पालकांना सांगणं. हीना सांगते, "आधी हा त्यांच्यासाठी धक्का होता. नंतर मात्र त्यांनी त्याला स्वीकारलं आणि आता तर ते माझ्याहून त्यालाच जणू जास्त जीव लावतात."

हिनाला आता इंडस्ट्रीत 11 वर्षं झाली असून कसौटी जिंदगी की 2 मध्ये तिनं केलेली कमोलिकाची भूमिका चाहत्यांनी खूप उचलून धरली. आता तिनं टीवीला ब्रेक देत मोठ्या पडद्यावरही स्वत:ला आजमावण्याचं ठरवलं. आणि यावर्षी तिला 'हॅक्ड'च्या माध्यमातून ओटीटीमध्ये डेब्युही करण्यास मिळाला.

First published: December 21, 2020, 4:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading