देसी गर्लच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण; तू माझी प्रेरणा आहेस, निकची प्रियांकासाठी स्पेशल पोस्ट
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनसच्या (Nick) लग्नाला नुकतीच 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्या दोघांनी एकमेकांसाठी पोस्ट लिहील्या त्यावर अनेक कॉमेंट्स आल्या आहेत.
मुंबई, 02 डिसेंबर : प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) यांच्या लग्नाला या वर्षी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त या दोघांनीही एकमेकांना अगदी वेगळ्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत. 1 डिसेंबर रोजी हिंदू पद्धतीने तर 2 डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने त्यांचं लग्न झालं होतं. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एकमेकांना खास संदेश लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांना चाहत्यांनीही सोशल मीडियावर उदंड शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर प्रियांकाने ते दोघे हातात हात घालून रस्त्याच्या कडेनं चालत आहेत, असा एक जुना फोटो शेअर केला आहे. त्यावर तिने लिहिले आहे, ‘लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन. नेहमी माझी साथ दिल्याबद्दल आभार. तू माझी ताकद आहेस, कमजोरी आहेस, सर्वस्व आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करते.’
निक जोनासनेही इन्स्टाग्रामवर त्या दोघांच्या लग्नाचा एक खास फोटो शेअर केला असून, त्यावर एक सुंदर संदेश लिहिला आहे. तो म्हणतो, ‘सर्वांत सुंदर, प्रेरणादायी व्यक्तीबरोबर झालेल्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रियांका, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आय लव्ह यू ! या दोघांच्या इन्स्टाग्रामवरील या पोस्टसवर चाहत्यांनी लाईक्सचा अक्षरश: पाऊस पाडला असून, लाखोंनी लाईक्स मिळाले आहेत.
बॉलीवूडच नव्हे तर हॉलीवूड गाजवणारी प्रियांका चोप्रा आणि अमेरिकेतील लोकप्रिय गायक, संगीतकार असलेला, लाखो तरुणींच्या ह्रदयाची धडकन असलेला निक जोनास यांनी एक डिसेंबर 2018 रोजी भारतीय पद्धतीनं लग्न केले, तर दोन डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. राजस्थानमधील जोधपूर इथं उमेद भवन या राजेशाही हॉटेलात तीन दिवस त्यांचा शाही विवाह सोहळा सुरू होता. त्यांच्या शाही विवाह सोहळ्याचे, पार्टीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या जोडीचे जगभरात अगणित चाहते असून सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियताही अफाट आहे.
सध्या प्रियांका आणि निक अमेरिकेत वास्तव्याला असून त्यांचे आलिशान घर, त्यांचे विविध ठिकाणच्या भेटींचे फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. प्रियांका आणि निकही सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. ते ही आपले अनेक फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असतात.
लवकरच प्रियांका ‘द व्हाईट टायगर’ आणि ‘वी कॅन बी हिरोज’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘द व्हाईट टायगर’ या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव प्रमुख भूमिकेत आहे.