मुंबई,5 जानेवारी- बॉलिवूडमधील आघाडीची नायिका म्हणून दीपिका पादुकोणला ओळखलं जातं. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर दीपिकाने बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येसुद्धा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच दीपिका पादुकोण शाहरुख खानसोबत 'पठाण' या बहुचर्चित चित्रपटात झळकणार आहे. दरम्यान आज ती आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिचा सहकलाकार शाहरुख खानने तिला खास पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाहूया शाहरुखने नेमकं काय म्हटलं आहे.
बर्थडे गर्ल दीपिका पादुकोण आज 37 वर्षांची झाली आहे. अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देत आपला दबदबा निर्माण केला आहे. दीपिका पादुकोणचा देशातच नव्हे तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जगभरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीला शुभेच्छा देणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच दीपिकाला या खास दिवशी शुभेच्छा देण्यामध्ये किंग खानसुद्धा मागे नाही. शाहरुख खानने खास पद्धतीने दीपिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण 'पठाण' मध्ये पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. याआधीही त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'पठाण' चित्रपटाचे अनेक पोस्टर आणि 'बेशरम रंग' हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अशातच आता शाहरुख खानने दीपिका पादुकोणचं नवं पोस्टर शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये दीपिका अगदी ऍक्शन मूडमध्ये दिसून येत आहे. तिच्या हातात बंदूक आहे. अभिनेत्रीचा हा लुक समोर येताच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
शाहरुख खानने पोस्टर शेअर करत लिहलंय, ' प्रिय @deepikapadukone साठी - प्रत्येक अवतारात स्क्रीनवर सत्ता मिळवणं तुला कस शक्य होतं?मला सदैव तुझा अभिमान वाटतो आणि तुला आयुष्यात नवीन उंची गाठण्यासाठी सदैव शुभेच्छा… वाढदिवसाच्या शुभेच्छा… खूप प्रेम'. असं म्हणत शाहरुख खानने दीपिकाचा वाढदिवस खास बनवला आहे.
दीपिका पादुकोनने 'ओम शांती ओम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या आपल्या पहिल्याच चित्रपटात ती किंग खान शाहरुखसोबत झळकली होती. हा चित्रपट तुफान गाजला होता. तेव्हापासून या दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे. या दोघांची ऑफस्क्रीन मैत्रीसुद्धा खूपच सुंदर आहे. दीपिका आणि शाहरुखने चेन्नई एक्प्रेस, हॅप्पी न्यू इयर,ओम शांती ओम अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. आता लवकरच ही जोडी पठाणच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Deepika padukone, Entertainment, Shahrukh khan