Home /News /entertainment /

Birthday Special: मोठ्या पडद्यावरील 'आम आदमी'चा मराठमोळा चेहरा, हे आहेत अमोल पालेकरांचे बेस्ट चित्रपट

Birthday Special: मोठ्या पडद्यावरील 'आम आदमी'चा मराठमोळा चेहरा, हे आहेत अमोल पालेकरांचे बेस्ट चित्रपट

बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर 'आम आदमी' अर्थात सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाला चेहरा मिळवून देण्याचं काम अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी केलं. आज अमोल पालेकर 76वा वाढदिवस साजरा करत आहेत.

    मुंबई, 24 नोव्हेंबर: अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून दीर्घकाळ काम केलं. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात पेंटर म्हणून केली, त्याचवेळी ते रंगभूमीवरही सक्रीय होते. त्यांच्या चित्रपटांमधील कामांमुळे त्यांचं रंगभूमीवरील काम मात्र काहीसं दुर्लक्षित राहिलं. हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या सहज अभिनयामुळे1970 च्या दशकात त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. बासू चटर्जी यांच्याबरोबर त्यांनी केलेल्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांना समीक्षकांचीही दाद मिळाली. आज अमोल पालेकर यांचा 76वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या काही सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटांविषयी... रजनीगंधा- अमोल पालेकर यांनी या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. बासू चॅटर्जी (Basu Chaterjee) यांनी याचे दिग्दर्शन केलं होतं. यात पालेकर यांनी संजय ही भूमिका साकारली होती. संजय आणि दिल्लीतील पदवीधर दीपा (Vidya Sinha) यांचे दीर्घकालीन प्रेमसंबंध असतात. संजय हा स्वभावाने चांगला आणि मिश्कील उमदा मुलगा असतो. त्याचबरोबर तो घरातील जबाबदारीही सांभाळत असतो. त्यामुळेच त्याच्या आणि दीपाच्या प्रेमाच्या नात्याला एक वेगळंच वळण मिळतं, अशी या चित्रपटाची कथा आहे. रजनीगंधा चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. उत्कृष्ट चित्रपटाचा फिल्म फेअर पुरस्कारही या चित्रपटानं पटकावला. त्यामुळे पुढे अमोल पालेकर यांनी बासू चॅटर्जी यांच्याबरोबर अनेक चित्रपट केले. (हे वाचा-'4 वेळा केला आत्महत्येचा प्रयत्न', 'काय पो छे'मधील सुशांतच्या सहकलाकाराचा खुलासा) छोटीसी बात- 1976 मध्ये आलेला हा रोमँटिक आणि विनोदी चित्रपट होता. या चित्रपटामुळे अमोल पालेकर यांच्या विनोदी अभिनयाची एक वेगळी छटा पुढे आली. यात त्यांनी एका मध्यमवर्गीय तरुण मुलाची भूमिका साकारली होती. अकाउंटंट असलेला हा तरुण लाजाळू असल्यानं प्रभा (विद्या सिन्हा) विषयी असलेल्या आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही असं याचं कथानक. या चित्रपटासाठी पालेकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.  बातों बातों में- हा देखील एक रोमँटिक आणि विनोदी चित्रपट होता. यामध्ये त्यांच्याबरोबर टीना मुनीम नायिकेच्या भूमिकेत होती. मुंबईच्या लोकलमध्ये या दोघांची भेट होते. ते आपली नोकरी आणि आयुष्य याविषयी गप्पा मारतात. त्यांची मैत्री फुलत असते मात्र एक गैरसमजामुळे त्याला दृष्ट लागते. या चित्रपटाला मोठं व्यावसायिक यश मिळालं आणि समीक्षकांनीही याचे कौतुक केले. (हे वाचा-अभिमानास्पद! या भारतीय वेबसीरिजने पटकावला International Emmy Award 2020) चितचोर- बासू चटर्जी दिग्दर्शित चितचोर या चित्रपटात अमोल पालेकर यांनी विनोद या तरुण मुलाची भूमिका साकारली होती. कंपनीचा बॉस समजून त्याला एका कुटुंबात विशेष वागणूक मिळते. त्या कुटुंबातील मुलीशी त्याचा विवाहही निश्चित होतो त्याचवेळी सत्य कळतं अशी ही कथा. पालेकर यांच्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली. गोलमाल- गोलमाल (Golmaal) हा पालेकर यांचा नि:संशय एक सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट आहे. हृषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला हा एक विनोदी चित्रपट होता. अनेक पुरस्कार, समीक्षकांची दाद यासह लाखो भारतीयांची मनं या चित्रपटानं जिंकली. यामध्ये अमोल पालेकर यांनी नोकरीच्या शोधात असलेल्य रामप्रसाद शर्मा या सीएची आणि त्याचा जुळा भाऊ लक्ष्मण प्रसाद शर्मा अशी दुहेरी भूमिका केली होती. 1979 मधील सर्वाधिक उत्पन्न मिळवणारा हा चित्रपट होता. यासाठी अमोल पालेकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या