Home /News /entertainment /

हमाल ते सुपरस्टार आणि आता राजकीय पक्षाचा प्रमुख; रजनीकांत यांचा थक्क करणारा प्रवास

हमाल ते सुपरस्टार आणि आता राजकीय पक्षाचा प्रमुख; रजनीकांत यांचा थक्क करणारा प्रवास

येत्या काळात रजनीकांत तामिळनाडूतील राजकारणात मोठे बदल घडवून आणणारे व्यक्ती ठरतील, हे निश्चित मानले जात आहे.

    नवी दिल्ली, 4 डिसेंबर : दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) आपल्या नव्या राजकीय पक्षाची 31 डिसेंबर 2020 ला घोषणा करणार आहेत. एप्रिलमध्ये होणाऱ्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत ते मोठा धमाका करतील अशी चर्चा सध्या सुरु आहे. एक हमाल ते सुपरस्टार आणि आता राजकीय पक्षाचे प्रमुख असा रजनीकांत यांचा प्रवास आहे, जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाबाबत. बऱ्याच काळापासून रजनीकांत राजकारणात सक्रिय होणार अशी चर्चा आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार असे सुतोवाच त्यांनी 3 वर्षांपूर्वी केले होते. चार महिन्यांनी तामिळनाडूत विधानसभा निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजकीय पक्ष स्थापन करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते या पक्षाच्या रचनेत व्यस्त होते. तामिळनाडूतील राजकारणाकडे पाहिले तर एखादा फिल्मस्टार रातोरात नेता होऊन राजकीय पट व्यापून टाकतो. त्यामुळे ही बाब देखील फारशी नवीन नाही. एमजी रामचंद्रन, करुणानिधींपासून जयललितांपर्यंत अनेक सुपरस्टार्स प्रथम सिनेमाचा पडदा गाजवून नंतर राजकारणात आले. त्यानंतर त्यांनी तामिळनाडूतील राजकारणावर अधिराज्य गाजवले. आता रजनीकांत याच पावलांवर पाऊल टाकत असून, त्यांनी निवडणूक लढवून राजकारणातही हिरो ठरले तर फारसे आश्चर्य वाटायला नको. दक्षिण भारतात आजही रजनीकांत यांची जादू कायम आहे. त्यांची एक वेगळीच क्रेझ असून हजारो फॅन क्लबही आहेत. आता रजनीकांत यांनी 31 डिसेंबरला नवीन राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याचे जाहिर केले आहे. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवरच त्यांचे नियोजन आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 3 वर्षांपूर्वीच केली होती घोषणा 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर रजनीकांत यांनी आपण लवकरच राजकारणात सक्रिय होणार असल्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर रजनी मक्कल मंद्रम या नावाने संघटना सुरु केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांच्या पश्चात तामिळनाडूतील राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे रजनीकांत यांना वाटते. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना चांगली संधी असेल. संघटनेच्या माध्यमातून करणार राजकीय मैदान बळकट रजनीकांत हे अचानक राजकारणात उतरत नाहीयेत. त्या दृष्टीने त्यांनी तयारी देखील केलेली आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपला राजकीय पट बळकट करीत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. जिल्हा स्तरावर संघटना बांधणी केली आहे. तसेच राजकीय कल देखील जाणून घेतला आहे. याच दरम्यान त्यांनी नोटाबंदी, काश्मीर प्रश्नासारख्या काही मुद्द्यांबाबत भाजपला उघडपणे समर्थन दिले आहे. तामिळनाडूत एकेकाळी एमजी रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता यांसारख्या चेहऱ्यांनी करिश्मा दाखवला होता. येथील सर्व राजकारण या व्यक्तींभोवतीच फिरत होते. मात्र या तिघांच्या निधनामुळे सध्या तामिळनाडूत अशा चेहऱ्यांची कमतरता आहे. डीएमकेकडे स्टॅलिन यांच्या रुपाने एक आश्वासक चेहरा आहे. भाजप सातत्याने या राज्यावर पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. या स्थितीत रजनीकांत जर निवडणुकीत उतरले तर मोठी खळबळ उडवू शकतात. असे असले तरी सुपरस्टार कमल हसन यांनी आपले पत्ते मात्र गुलदस्त्यातच ठेवले आहे. हमाल ते सुपरस्टार असा प्रवास रजनीकांत यांचा हमाल, बस कंटक्टर ते सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास विलक्षण राहिला आहे. सध्या ते 70 च्या उंबरठ्यावर आहेत. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. खरे तर रजनीकांत यांच्यासाठी आयुष्य कधीच सोपे नव्हते. त्यांचे सुरुवातीचे दिवस खूपच अडचणीचे होते. रजनीकांत पाच वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. आईच्या निधनानंतर कुटुंबाचे पालनपोषण करणे सोपे नव्हते. कुटुंबासाठी त्यांनी हमालीचे काम देखील केले. सुपरस्टार होण्याआधी रजनीकांत बस कंडक्टर होते. बालचंद्र यांच्या अपूर्व रागनगाल या सिनेमाव्दारे रजनीकांत यांनी तामिळ सिनेसृष्टीत प्रवेश केला. पण कन्नड नाटकांमधून त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही सिनेमांमध्ये त्यांनी नकारात्मक भूमिका साकारल्या. एस. पी. मुथुरमन यांच्या ओरु केल्विकुरी या चित्रपटातून ते नायक म्हणून पुढे आले. बिल्ला या चित्रपटातील भुमिकेमुळे ते दक्षिणात्य सुपरस्टार बनले. 80 च्या दशकाच्या प्रारंभीच रजनीकांत यांनी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला. याकाळात त्यांचे चित्रपट हिट होत होते आणि बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडत होते. रजनीकांत यांच्या लग्नाची कहाणी देखील मनोरंजक आहे. एक महाविद्यालयीन युवती त्यांची मुलाखत घेऊ इच्छित होती. परंतु यास त्यांनी अनेकदा नकार दिला होता. अखेरीस त्यांनी मुलाखतीसाठी होकार दिला. मात्र मुलाखत घेण्यासाठी आलेली युवती पाहून ते क्षणभर थक्कच झाले. दक्षिणेचा हा सुपरस्टार एकीकडे त्या युवतीच्या प्रश्नांना उत्तर देत होता आणि दुसरीकडे त्याला असे जाणवत होते की आपण जिचा शोध घेत आहोत ती मुलगी हीच आहे. मुलाखत संपताच रजनीकांत यांनी त्या युवतीपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. याबाबतचा निर्णय माझे पालकच घेतील असे त्या मुलीने लाजत सांगितले. 1980 ची ही गोष्ट आहे. चेन्नईतील एथिराज कॉलेजच्या नियतकालिकासाठी रजनीकांत यांची मुलाखत घेण्याचे ठरले. मुलाखत घेण्याची जबाबदारी इंग्रजी साहित्याची अभ्यासक लता रंगाचारी हिला देण्यात आली. मात्र लता यांना रजनीकांतची वेळ घेण्यात अडचणी येत होत्या. टॉलिवूडमधील संपर्काच्या आधारे त्यांना रजनीकांत यांची वेळ मिळाली. पण रजनीकांत मुलाखत देण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते. अखेरीस मुलाखत झाली. त्यानंतर लग्नाबाबत त्यांनी लता यांना विचारले. लता यांच्या आई-वडीलांचे मन वळविण्यासाठी चित्रपटसृष्टीतील काही दिग्गजांनी रजनीकांत यांना मदत केली. आणि अखेरीस या लग्नाला परवानगी मिळाली. 26 फेब्रुवारी 1981 ला रजनीकांत तिरुपती येथील भगवान बालाजी मंदिरात विवाहबध्द झाले. त्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या. लग्नानंतर रजनीकांत यांचे नशीब अधिकच चमकले. त्यानंतर अभिनेत्री सिल्क स्मिता आणि रजनीकांत यांच्या अफेअरची जोरदार चर्चा झाली. यामुळे त्यांचे लग्न देखील धोक्यात आले होते. द नेम इज रजनीकांत या पुस्तकात लेखिका गायत्री श्रीकांत यांनी सिल्क स्मिता आणि रजनीकांत यांच्यातील अफेअरची चर्चा 80 च्या दशकात कशी रंगली होती, हे नमूद केलं आहे. जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की जी रजनीकांतसारख्या सुपरस्टारसाठी अशक्य आहे. मात्र वैयक्तिक आयुष्यात ते एक सामान्य व्यक्ती आहेत. आपल्या समर्थकांची दीर्घकाळापासून असणारी मागणी लक्षात घेत त्यांनी राजकारणात उडी घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ते तामिळनाडूतील राजकारणात मोठे बदल घडवून आणणारे व्यक्ती ठरतील, हे निश्चित मानले जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Tamilnadu

    पुढील बातम्या