मुंबई, 01 जानेवारी : प्रत्येक वाहिनी आपला टीआरपी वाढवण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी दोन महिन्यातून एकदा महाएपिसोड करतात. खरं तर बरेच दिवस झी मराठी टीआरपी रेटिंगमध्ये पहिल्या पाचात आहे. तरीही या रविवारी 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेचा महाएपिसोड आहे.
सध्या 'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये बऱ्याच घटना घडतायत. गुरूनं नोकरीत राजीनामा दिलाय. घरदार सोडून तो शनायाकडे आलाय. शनायाच्या आईला हे फारसं पसंत नाहीय. कारण तिला गुरूचा पैसा हवाय.
या महाएपिसोडमध्ये गुरू शनायाला घेऊन पळून जातो. राधिका किंवा तिची आई या कोणालाच मागमुस लागू न देता. भटजींना बोलवून दोघांच्या लग्नाचे विधी सुरू होतात. लग्नाचे फेरेही घ्यायला सुरुवात होते. तीन फेरे घेतल्यावर तिथे अचानक येते राधिका. घटस्फोट न झाल्यामुळे कायद्यानं दोघं लग्न करू शकत नाहीतच.
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेच्या महाएपिसोडमध्ये बरंच नाट्य घडणार आहे. बराच मेलोड्रामाही होणार आहे.
'गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास २ वर्षांपूर्वी सुरू झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. नुकतीच मालिकेत नवीन शनायाची एंट्री झाली. रसिका सुनीलच्या जागी आता अभिनेत्री ईशा केसकर ही शनाया म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. प्रेक्षक या नव्या शनायाला देखील तितकंच पसंत करत आहेत.
ईशाला देखील शनायासारखीच शॉपिंगची खूप आवड आहे. नुकतंच तिने रसिकाची जागा घेतली असल्यामुळे मालिकेच्या कपडेपटातले रसिकाचे कपडे ईशाला होत नाहीत. त्यामुळे काही दिवस आधीचे कपडे वापरून तिनं वेळ निभावून नेली. पण ईशासाठी नवे कपडे आणावे लागले. त्यामुळे शूटिंगमधून वेळ काढून तिच्यासाठी कपड्यांची खरेदी जोरात सुरू आहे म्हणे. प्रेक्षकांना नव्या शनायाचा लुकही आवडतोय.