Home /News /entertainment /

Kiran Mane : 'अशा प्रवृत्तींना आमच्या हद्दीत प्रवेश नाही', गुळुंब ग्रामपंचायतीचा 'स्टार प्रवाह'ला मोठा झटका

Kiran Mane : 'अशा प्रवृत्तींना आमच्या हद्दीत प्रवेश नाही', गुळुंब ग्रामपंचायतीचा 'स्टार प्रवाह'ला मोठा झटका

'मुलगी झाली हो' या मालिकेचं सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील गुळुंब गावात चित्रिकरण सुरु आहे. पण किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर गुळुंब ग्रामपंचायतीने मालिकेच्या चित्रिकरणास परवानगी नाकारली आहे.

    सातारा, 15 जानेवारी : सोशल मीडियावर राजकीय भूमिका मांडली म्हणून 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना मालिकेतून काढून टाकण्यात आलंय. या प्रकरणावरुन राज्यभरातून 'स्टार प्रवाह' आणि 'मुलगी झाली हो' मालिकेच्या निर्मात्यांसह टीमवर टीका केली जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 'मुलगी झाली हो' या मालिकेचं सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील गुळुंब गावात चित्रिकरण सुरु आहे. पण किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर गुळुंब ग्रामपंचायतीने मालिकेच्या चित्रिकरणास परवानगी नाकारली आहे. गुळुंब गावाच्या सरपंच स्वाती शिवाजी माने यांनी याबाबतचं पत्र 'स्टार प्रवाह' वाहिनी आणि 'मुलगी झाली हो' मालिकेच्या टीमला पाठवले आहे. गुळुंबच्या सरपंच पत्रात नेमकं काय म्हणाल्या? "राजकीय भूमिका मांडणाऱ्या मराठी कलावंताला मालिकेतून काढल्याबद्दल मराठी चित्रपटसृष्टीचा जाहीर निषेध! अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनी आणि मुलगी झाली हो या मालिकेची संपूर्ण टीमने हे विसरु नये की, महाराष्ट्रात अजनूही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर लोकशाही नांदते. अशा मनुवादी विचारसरणीच्या स्टार प्रवाह वाहिनी आणि मुलगी झाली हो मालिकेच्या टीमचे आमच्या गावी होत असलेल्या चित्रीकरणाला ग्रामपंचाय गुळुंब तालुका वाई जिल्हा सातारा मान्यता नाकारत आहे. अशा प्रवृत्तीला इथून पुढे आमच्या हद्दीत प्रवेश नाही", असं पत्र गुळुंब गावाच्या सरपंच स्वाती शिवाजी माने यांनी पाठवलं आहे. किरण माने यांची पहिली प्रतिक्रिया : दरम्यान, मालिकेतून काढून टाकल्यानंतर किरण माने यांनी काल पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'हे मला सुद्धा धक्कादायक आहे. काम करत असताना, हा वेळेत काम करतोय ना, वेळेत हजर होतोय ना, प्रॉडक्शन हाऊसमध्ये काही तक्रारी आहे का, मानधन कमी घेतो का असं असेल तर समजू शकतो. अनेक वेळातर मेकअप रुममध्ये फॅन नसतो, कलाकारांना टॉयलेट सुद्धा नसतात. अशा अनेक अडचणी सहन केल्या आहे. मी माझे काम चोखपणे बजावले आहे. पण, मी जेव्हा फोन केला तेव्हा कळलं की, मी राजकीय भूमिका घेतो म्हणून मला कामावरून कमी केलं आहे' असं किरण माने यांनी सांगितलं. (हे वाचा:'ही कोणती झुंडशाही?' मालिकेतून काढल्यानंतर किरण मानेंची पहिली प्रतिक्रिया VIDEO ) "मालिकेच्या सेटवरुन गेल्यांनतर मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. सोशल मीडियावर मी जे काही व्यक्त झालो तो किरण माने वेगळा आहे. राजकीय भूमिका मांडणे हे माझे व्यक्तीगत विचार आहेत. तो माझा हक्क आहे. मी घरात काय खातो, मी बाहेर काय बोलतो, कपडे काय घालतो, यावर कुणीही बंधन ठेवू नये. ही लोकशाही आहे, हा काही अफगानिस्तान नाही, पाकिस्तान नाही. हा भारत आहे", असंही माने म्हणाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या