Gully Boy Movie Review- कोई दुसरा मुझे बताएगा के मैं कौन है?

आयुष्यात यश सहज मिळत नाही. त्यासाठी अथक मेहनत घ्यावी लागते. रात्रीचा दिवस करावा लागतो. हेच या सिनेमातून प्रकर्षाने दाखवण्यात आलं आहे.

Madhura Nerurkar | News18 Lokmat | Updated On: Feb 14, 2019 03:34 PM IST

Gully Boy Movie Review- कोई दुसरा मुझे बताएगा के मैं कौन है?

ज्या दिवसापासून गली बॉयचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हापासून या सिनेमाबद्दल रणवीर आलियाच्या चाहत्यांमध्ये कमालिची उत्सुकता होती. दिग्दर्शक झोया अख्तरनेही पहिल्यांदा आपल्या पठडीपेक्षा वेगळा सिनेमा दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या प्रयत्नाचं कौतुक नक्कीच करावं लागेल. गली बॉय सिनेमातून झोयाने स्ट्रीट रॅपरचा संघर्ष दाखवला आहे. पण तरीही सिनेमा पाहून बाहेर पडल्यावर खासकरून आलिया भट्ट आणि नंतर रणवीर सिंग लक्षात राहतात. त्यापेक्षा जास्त काही लक्षात राहत नाही हे झोयाचं अपयश आहे.

मुंबईतील धारावी १७ मध्ये राहणाऱ्या मुरादच्या (रणवीर सिंग) संघर्षाची ही गोष्ट आहे. मुरादला आपल्या गरिबीवर मात करायची असते. त्यासाठी काय करावं याबद्दल त्याला फारसं काही माहीत नसतं. स्वतःचं अस्तित्व शोधताना त्याला रॅपची फार मदत होते. अनेकदा तो आपल्या मनातील दुःख लेखणीच्या माध्यमातून वहीत लिहायचा. सफीना (आलिया भट्ट) त्याची लहानपणापासूनची गर्लफ्रेंड असते. ती एका श्रीमंत घरातली मुलगी असते. तिचे वडील डॉक्टर असतात तर तीही सर्जन व्हायचं शिक्षण घेत असते. मुराद आणि सफीनाच्या राहणीमानात कमालीचं अंतर असतं. दरम्यान मुरादचे वडील (विजय राज) दुसरं लग्न करतात. वडिलांनी केलेलं हे कृत्य मुरादला मान्य नव्हतं. आईची होणारी फडफड तो पाहत होता. पण वडिलांसमोर बोलायची त्याची फारशी हिंमत नव्हती. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृत्याला तो मुकपणे होकार देत असतो.

मन मारून जगत असताना अचानक मुरादच्या कॉलेजमध्ये रॅपर एमसी शेर (सिद्धांत चतुर्वेदी) येतो. या दिवसापासून त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळायला लागते. आपणही एमसी शेर व्हावं अशी इच्छा मुरादची असते. शेरकडूनच तो रॅपचं प्रशिक्षण घेतो. मात्र पुन्हा एकदा नशीब त्याला जमिनीवर आणतं. काही कारणांमुळे मुरादला वडिलांची ड्रायव्हरची नोकरी करावी लागते. दरम्यान त्याची ओळख म्युझिक प्रोग्रामर स्कायशी (कल्की कोचलीन) होते. स्काय, मुराद आणि एमसी शेर एकत्र येऊन एक गाणं रेकॉर्ड करतात. इथून मुरादच्या गली बॉय प्रवासाला सुरुवात होते. मात्र नोकरी की रॅप यापैकी काय निवडायचं याच्या द्विधा मनःस्थितीत तो असतो. या सगळ्यात मुराद त्याचं रॅपर व्हायचं स्वप्न कसं पूर्ण करतो हे पाहण्यासाठी एकदा गली बॉय सिनेमा पाहावा लागेल.

संपूर्ण सिनेमात रणवीर सिंगपेक्षाही प्रेक्षकांना आवडते ती आलिया भट्ट. आलियाचं प्रतिकुल परिस्थितीतही प्रेमाची साथ न सोडण्याची जी जीगर असते त्याला अनेकजण दाद देतात. प्रेमासाठी निर्भिडपणे समाजाला तोंड द्यायची तिची हिंमत पाहण्यासारखी आहे. सिनेमा पाहताना रणवीर मुरादची व्यक्तिरेखा जसा जगला त्याचप्रमाणे आलियानेही सफिनाची व्यक्तिरेखा जगली असं म्हणावं लागेल. यात एमसी शेर अर्थात सिद्धांत चतुर्वेदीही लक्षात राहतो. अनेक सीन्समध्ये रणवीरवर आलिया आणि सिद्धांत भारी पडलेले दिसतात. मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावं हे सिद्धांतकडे पाहून कळतं. विजय राज यांनी कडक वडिलांची, अमृता सुभाषने प्रेमळ आईची भूमिका चांगली वठवली आहे. कल्की कोचलीनच्या वाट्याला मोठी भूमिका आली नसली तरी तिने चांगले काम केले आहे.

रॅपरच्या आयुष्यावर सिनेमा म्हटल्यावर त्यात उत्तम गाणी आणि कविता असणं पर्यायाने आलंच. पण, सिनेमाची सर्वात जमेची बाजू अभिनय आणि सिनेमॅटोग्राफी आहे. सिनेमातले संवाद, गाणी, कविता प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहतील. संपूर्ण सिनेमा पाहताना लिखाणावर किती मेहनत घेतली आहे हे स्पष्ट दिसते. आयुष्यात यश सहज मिळत नाही. त्यासाठी अथक मेहनत घ्यावी लागते. रात्रीचा दिवस करावा लागतो. हेच या सिनेमातून प्रकर्षाने दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास आणि प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्याची तयारी असणाऱ्या प्रत्येकासाठी हा सिनेमा आहे.

Loading...

सिनेमाची कथा जेवढी साधी तेवढी ती साकारण्यास कठीण असते. गली बॉयच्या बाबतीतही असंच काही झालं आहे. ६० एमएमच्या पडद्यावर रॅपरचं आयुष्य उभारताना झोयाने सिनेमा उगाच लांबवला असं अनेकदा वाटतं. पूर्वार्ध फार संथ आहे. आता कुठे सिनेमा कळतोय असं वाटत असताना मध्यांतर येतो. उत्तरार्धात सिनेमा चांगली पकड घेतो. पण मुळात अडीच तासांपेक्षा जास्त मोठा असलेला फार बोअर वाटू लागतो. अनेकदा प्रेक्षक आपलं लक्ष विचलीत करून मोबाईल पाहू लागतात. प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यात झोयाला अपयश आलं असंच म्हणावं लागेल. सिनेमाचा शेवट तर अनपेक्षित आहे. एकंदरीत कथेत दम नसला तरी तगड्या कलाकारांमुळे झोयाचा गली बॉय तरून गेला असं म्हणावं लागेल.

सिनेमा- गली बॉय

दिग्दर्शक- झोया अख्तर

कलाकार- रणवीर सिंग, आलिया भट्ट, सिद्धांत चतुर्वेदी, विजय राज, अमृता सुभाष, कल्की कोचलिन


- मधुरा नेरुरकर


Madhura.Nerurkar@nw18.com

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 01:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...