मुंबई, 26 मे : महाराष्ट्राची लावणी क्वीन म्हणून नव्यानं ओळख मिळवलेलं नाव म्हणजे गौतमी पाटील. गौतमीने महाराष्ट्रभर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी गौतमीला पाहण्यासाठी तुफान गर्दी आणि चाहत्यांचा गोंधळ होतो. लहान मुलांच्या वाढदिवसापासून ते सत्यनारायणाच्या पुजेपर्यंत गौतमीच्या लावणीचं आयोजन केलं जातं. गौतमीला फॉलो करणाऱ्यांची आणि कार्यक्रमांना गर्दी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गौतमीवर कितीही आरोप झाले तरी तिच्या कार्यक्रमांची गर्दी काही कमी होत नाही. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. आता काही काळापासून गौतमीच्या आडनावावरून नवीन वाद सुरु झाला आहे. त्याविषयी नवीन अपडेट समोर आली आहे.
पाटील आडनावालाच मराठा संघटनांनी विरोध केला आहे. पुण्यात गौतमीच्या आडनावाच्या वादावरून एक बैठक पार पडली. या बैठकीत गौतमीचे आडनाव पाटील नसल्याचा दावा करण्यात आला आहे. 'गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करते आहे. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही', असा थेट इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी दिला. पण यानंतर गौतमीने 'माझं नाव पाटिल आहे मी पाटीलच नाव लावणार ना आता कोण काय बोलतोय मला फरक पडत नाही ...माझा कार्यक्रम सांस्कृतिक आहे.' अशी प्रतिक्रिया नोंदवली.
गौतमीच्या या प्रतिक्रियेनंतर आता तिला जळगावच्या मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक सुरेंद्र पाटील यांनी पाठींबा दर्शवला आहे.
Gautami Patil Video : भर कार्यक्रमात गौतमीने मुलाला केलं जवळ, धरला हात अन् ...
गौतमी पाटील हिच्या पाटील आडनावाला पुण्यातील एका मराठा संघटनेने विरोध दर्शवला आहे. गौतमी ही पाटील हे आडनाव लावत असल्यामुळे मराठा समाजाची बदनामी होत असल्याचा आक्षेप घेण्यात आलेला आहे. पुण्यातल्या संघटनेच्या भूमिकेचा मराठा सेवा संघाचे जळगावातील मार्गदर्शक सुरेंद्र पाटील यांनी निषेध व्यक्त केलाय. पाटील ही पदवी असून ती मराठा समाजाची मक्तेदारी नाही.' असं ते म्हणाले.
याबाबतच बोलताना पुढे ते म्हणाले कि, ' मराठा समाजाप्रमाणे इतर समाजातही पाटील हे आडनाव लावलं जातं. त्यामुळे गौतमीला पाटील आडनावावरून इशारा देणे योग्य नाही. यापूर्वीही महाराष्ट्रात लावणी आणि तमाशाला बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तसाच काहीसा प्रकार गौतमी पाटीलच्या बाबतीत घडत आहे. गौतमी पाटील ही उत्तम कलावंत आहे. तिच्याकडे कलेच्या नजरेतून बघायला हवं. भविष्यात मराठा सेवा संघ गौतमी पाटीलच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही देखील सुरेंद्र पाटील यांनी दिली.
गौतमी पाटीलच्या आडनावावरून सुरु झालेला हा वाद पुढे कोणतं वळण घेतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.