मुंबई, 22 मार्च, प्रतिनिधी-गणेश दुडम - आपल्या लावणीच्या कार्यक्रमांतून धुमाकूळ घातलेली लावणी कलाकार म्हणजे गौतमी पाटील होय. गौतमीला जितकं कौतुक मिळतं तितकंच टीकेलाही समोर जावं लागतं. अश्लील हावभाव आणि लावणीच्या चुकीच्या स्टेप्स करत गौतमी अनेकवेळा चर्चेत आली आहे. गौतमी पाटील म्हटलं की तिथे राडा नक्की होणार असं एक समीकरण बनल्याचं दिसून येत आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अनेकवेळा वादविवाद झालेले दिसून आलं आहे. यावेळीही असंच काहीसं झालं आहे.
गौतमी पाटील सध्या प्रचंड चर्चेत आहे. आपल्या लावणी आणि सौंदर्याने तिने लोकांना भुरळ पाडली आहे. गौतमीचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. हे लोक सतत तिच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. तसेच गावामध्ये होणाऱ्या यात्रा, वाढदिवस अशा विविध कार्यक्रमांना तिच्या लावणीचे कार्यक्रम ठेवले जात आहेत. हे कार्यक्रम क्वचितच शांततेत पार पडतात. कारण बहुतांश वेळी गौतमीच्या कार्यक्रमात राडा झालेला दिसून येतो. पुन्हा एकदा असंच काहीसं झालेलं दिसून येत आहे.
(हे वाचा: Vandana Gupte: मराठमोळ्या वंदना गुप्तेंनी 70 व्या वर्षी पुन्हा बांधली लग्नगाठ; समोर आले फोटो)
मावळातील मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लगत असलेल्या गहूंजे गावात चौंडाई मातेच्या यात्रे निमित्ताने मनोरंजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये गौतमी पाटीलच्या लावणीच्या कार्यक्रमाचा बेत ग्रामस्थांनी आखला होता. इतकंच नव्हे तर गौतमीला एक लाख वीस हजाराची सुपारी देण्यात आली होती. ठरल्या प्रमाणे मनोरंजनाच्या कार्यक्रमाला सुरुवातही झाली होती. गौतमी पाटील येताच गहूंजे गावातील ग्रामस्थ बेफान होऊन नाचू लागले होते.
मात्र गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात काही ना काही गोंधळ होतो याची पूर्व कल्पना ठेऊन शिरगावं परंदवाडी पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांना खुर्च्या वापरण्याची परवानगी नाकारली होती. खाली जमिनीवर बसण्यास परवानगी दिली. परंतु तरीही मद्यधुंद अवस्थेत गाण्याच्या तालावर गहूंजे ग्रामस्थ आपले भान हरपून गेले आणि राडा होण्याच्या आत पोलिसांनी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम बंद केला.
गौतमी पाटीलचा चालू कार्यक्रम बंद पडल्यामुळे ग्रामस्थांचा हिरमोड झाला मात्र पोलीसांच्या प्रसंगावधानमुळे कोणताही राडा झाला नाही.दरम्यान गौतम पाटील च्या कार्यक्रमाची परवानगी शिरगावं परंदवडी पोलीसांनी कशी दिली याबाबत ही पंचक्रोशीत चर्चेला उधाण आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Gautami Patil