मुंबई, 22 ऑगस्ट : मुळशी पॅटर्न सिनेमाचे दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले. पण, गणरायाच्या मूर्तीच्या पाटाखाली देशाचे संविधान ठेवल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले. अखेर प्रविण तरडे यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
प्रविण तरडे यांनी या व्हिडिओ आपल्या हातातून झालेली चूक मान्य केली आहे. 'मी माझ्या घरी या वर्षी पुस्तक बाप्पा अशी संकल्पना केली होती. पण, यावेळी माझ्याकडून चूक झाली. गणरायाच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधान ठेवले होते. कारण, गणराय हा बुद्धीचा आणि कलेचा दैवता आहे. त्यामुळे अशी माझी भावना होता. पण, ती खूप मोठी चूक होती' अशी कबुली तरडेंनी दिली.
तसंच, 'या प्रकारानंतर अनेकांचे फोन आले, एसएमएस आले. त्यांच्या भावना समजून गणपतीच्या पाटाखाली ठेवण्यात आलेले संविधान हे आदरपूर्वक बाजूला केले आहे. यापुढे अशी चूक होणार नाही' असी ग्वाहीही तरडे यांनी दिली.
काय आहे वाद?
प्रविण तरडे यांनी आपल्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. घरच्या गणपतीसाठी तरडे यांनी पुस्तकांचे डेकोरेशन केले आहे. गणरायाच्या मूर्तीच्या बाजूला चारही बाजूने पुस्तकं सजवली आहे. यात गणेशाची मूर्ती ही पाटावर ठेवली आणि पाटाखाली देशाची राज्यघटना अर्थात संविधानाचे पुस्तक ठेवले.
संविधान गणेश मूर्तीच्या पाटाखाली ठेवल्याने प्रविण तरडे हे सोशल मीडियावर ट्रोल झाले. सोशल मीडियावर प्रविण तरडे यांच्यावर लोकांनी जोरदार आक्षेप घेतला. देशाचे संविधान हे पाटाखाली ठेवण्याचा खोडसाळपणा का केला? असा जबाबच प्रवीण तरडेंना विचारण्यात आला.
सोशल मीडियावर जोरदार ट्रोल झाल्यामुळे अखेर प्रविण तरडे यांनी तो फोटो डिलीट करून टाकला. त्यानंतर नव्याने संविधान पाटाखाली नसलेला फोटो गणपती प्रतिष्ठापनेचा फोटो पोस्ट केला आहे.
परंतु, प्रविण तरडे यांनी हा मुद्दामहून खोडसाळपणा केला, असा आरोप करत सोशल मीडियातील लोकांनी तरडे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
प्रवीण तरडेवर कारवाई करा म्हणून सोशल मीडीयावर जोरदार मागणी केली जात आहे.
प्रवीण तरडे भारतीय संविधान हे फक्त पुस्तक नाहीये अन तू हा खोडसाळपणा जाणीवपूर्वक केला आहे.
प्रत्येक वेळेस तुझी नीच मानसिकता का दाखवतो. pic.twitter.com/Ie3q4tWjdd
— Pratik Patil (@Liberal_India1) August 22, 2020
याआधीही CAA आंदोलनावरुन प्रविण तरडे यांनी केलेल्या पोस्टमुळे वाद पेटला होता. पत्रकार राजू परुळेकर यांच्या पोस्टला कमेंट करताना त्यांनी भाजपची बाजू घेतली होती. त्यामुळे लोकांनी तरडे यांना चांगलेच ट्रोल केले होते. त्यावेळीही तरडे यांना आपली पोस्ट डिलीट करावी लागली.