मराठी चित्रपटांची आषाढ'वारी'!

मराठी चित्रपटांची आषाढ'वारी'!

विठ्ठल नाद घुमू लागलाय आणि संपूर्ण पंढरी दुमदुमली आहे ती या विठ्ठलाच्या भक्तिरसात. हाच भक्तिरस आपल्या मराठी सिनेमातही अधून मधून डोकावतो आणि वारीचा हा रंग बॉक्स ऑफिसवरही चढतो.

  • Share this:

चित्राली चोगले, 04 जुलै : विठ्ठल नाद घुमू लागलाय आणि संपूर्ण पंढरी दुमदुमली आहे ती या विठ्ठलाच्या भक्तिरसात. हाच भक्तिरस आपल्या मराठी सिनेमातही अधून मधून डोकावतो आणि वारीचा हा रंग बॉक्स ऑफिसवरही चढतो. विशेष म्हणजे हे निवडक सिनेमे गेल्या काही वर्षात फक्त पंढरपूरात शूट होतायेत किंवा वारीचा माहोल टिपतायेत असं नाही तर त्यांचं रिलीजही या वारीच्या जवळपास केलं जातं आणि त्याचा फायदा कुठे ना कुठे सिनेमाला नक्कीच होतो.

यात 2011च्या 'गजर'ने सुरुवात करुयात. या आधी अनेक सिनेमे विठुमाऊली आणि वारीवर केंद्रीत बनवले गेले या असले तरी हा सिनेमा वेगळा ठरला. सिनेमातच मुळात सिनेमा बनवण्याचा प्रवास होता. पार्थ नावाचा दिग्दर्शक वारीवर आणि त्या 18 दिवसांच्या वारकऱ्यांच्या प्रवासावर सिनेमा बनवू इच्छित असतो. त्याला एका अमेरिकन मित्राची साथ यात लाभते. या प्रवासात अतिशय सुंदर सीन्सची गुंफण आहे. तर सिनेमा बनवण्याच्या या प्रवासात विठ्ठलाशी तसं काहीच नातं नसलेला हा पार्थ या विठ्ठल रंगात कसा न्हाहून निघतो आणि ओघाने हा प्रवास त्याच्या आयुष्याला कशी कलाटणी देतो यावर सिनेमा बेतलेला आहे.

2012ला अगदी जून महिन्यात तुकाराम हा सिनेमा रिलीज झाला. हा सुद्धा वारीच्या मुहुर्तावरच. सिनेमात संत तुकारामांची  जीवनगाथा रचली गेली. त्यांची भक्ती त्यांचे अभंग आणि त्यांचा जीवनप्रवास आजही अनेक वारकऱ्यांसाठी श्रद्धास्थान ठरतं. पंढरपुरातली दृष्य, वारकऱ्यांची निरागस भक्ती हे सगळं सिनेमात चोख टिपलं गेलं...संत तुकाराम आणि विठ्ठल हे नातं त्यात वारीची वेळ सगळंच सिनेमासाठी जुळून आलं आणि सिनेमाने बॉक्स ऑफिस गाठलं. त्यावर उत्तम प्रतिसादही सिनेमाला मिळाला.

'आपली लाथ भारी,आपला हात भारी, च्या मायला आपलं सगळंच लय भारी' म्हणत रितेश देशमुखने लय भारी सिनेमातून मराठीत पदार्पण केलं.सिनेमात रितेशचं नावंच माऊली होतं. त्यात सिनेमाची कथा रेखाटली होती ती पंढरपुरात. रितेशची विठ्ठल भक्ती ही विशेष होती. सिनेमाची चर्चा तर भरपूर होती.रितेशच्या मराठीतल्या एन्ट्रीपासून हाय असलेल्या बजेटपर्यंत. त्यात हा सिनेमासुद्धा ऐन वारीत ऐन पंढरपुरात शूट केला गेला.भव्य दिव्य असे सीन्स वारीचं खरंखुरं फुटेज उठून दिसलं.

सिनेमाची गाणीही गाजली.या सिनेमाला सुद्धा जूनमध्येच रिलीज केलं गेलं कारण माहोल सिनेमाच्या विषयाला योग्य होता.वारी सुरु झालेली, आषाढी जवळ होती आणि हा निर्णय योग्य ठरला. 4 आठवड्यात तब्बल 33 कोटींची कमाई करत सिनेमा त्यावेळच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमात पहिल्या नंबरवर होता. 'च्या मायला सगळंच लय भारी झालं'या सिनेमाचं.

याच वेळेच्या आसपास एलिझाबेथ एकादशी सिनेमा बनून जवळपास तयार होता. त्यातल्या कथेतलं सुद्धा वारी आणि पंढरपूर अधोरेखित होतं.वारीच्या अवतीभवती फिरणारी ही कथा सुद्धा या वारीच्याच आसपासल रिलीज व्हावी असं निर्मात्यांना वाटलं असावं पण सिनेमा पूर्ण नव्हता त्यात लय भारीसोबत सिनेमा रिलीज होऊन दोन्ही सिनेमांचं नुकसान नको म्हणून सिनेमा 2012च्या नोव्हेंबरमध्ये चिल्ड्रन्स डेचं निमित्त साधत रिलीज झाला. सिनेमाला अतिशय उत्तम प्रतिसाद देखील मिळाला. पण या सिनेमाची कथा बघता सिनेमाची वारी त्या वर्षी चुकलीच म्हणावं लागेल.

तर आता हाच मुहुर्त आणि वारीचे दिवस साधत रिंगण प्रदर्शित झालाय. सिनेमात बाप-लेकाच्या नात्याची गुंफण. विठ्ठलाची भक्ती...पंढरपूर या सगळ्याचं मनोहारी दर्शन झालं. प्रेक्षकही रिंगणला चांगला प्रतिसाद देत आहेत..

एकूणच सिनेमांची ही आषाढवारी नक्कीच रंजक ठरतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2017 04:09 PM IST

ताज्या बातम्या