मुंबई, 02 जानेवारी: सलमान खानने (Salman Khan) आपल्या आगामी राधे (Radhe) या चित्रपटाचे सॅटेलाईट, नाट्य, डिजिटल आणि संगीताचे हक्क तब्बल 230 कोटींना झी स्टुडीओला (Zee Studio) विकल्याची चर्चा आहे. याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु ईदच्या (Eid) पार्श्वभूमी रिलीज होणारा आगामी चित्रपट राधे (Radhe) हा केवळ सिनेमागृहांमध्येच प्रदर्शित करावा, अशी विनंती करणारे पत्र चित्रपट प्रदर्शन संघटनेने सलमान खान याला लिहिले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिनेमागृह क्षेत्र अडचणींचा सामना करीत असून या क्षेत्राला मदतीचा हात द्यावा, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
उत्तराखंड, आसाम, तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, बिहार, तेलंगणा, दिल्ली, डेहराडून आणि हैद्राबाद येथील संघटनांच्या या पत्रावर सह्या आहेत. ईदच्या निमित्ताने रिलीज होणारा हा चित्रपटदेखील आजपर्यंतच्या चित्रपटांप्रमाणेच मनोरंजनाचा धमाका ठरेल, असे मत संघटनेने व्यक्त केले आहे. हा चित्रपट ईदसारख्या महोत्सवाच्या काळात प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरेल आणि प्रेक्षकांचे पाय आपोआपच चित्रपटगृहाकडे वळतील. यामुळे कोरोनामुळे अडचणीत असलेल्या सिनेमागृहक्षेत्राला मोठा हातभार लागेल, असे संघटनेचे म्हणणे आहे.
Dear @BeingSalmanKhan, Here’s a humble appeal by the film exhibition sector. Truly hope #Radhe can offer some much needed relief to theatres & joy to your fans all over the country! We want #RadheOnEid in cinemas! #SupportCinemas #SaveJobs #India #RadheInCinemas @SKFilmsOfficial pic.twitter.com/GavtZQwJfz
— Akshaye Rathi / अक्षय राठी (@akshayerathi) January 2, 2021
या पत्रात म्हणले आहे, की प्रिय सलमान खान, आशा आहे की या पत्रातून आमची मागणी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला माहिती आहेच की 2020 हे वर्ष कोट्यावधी देशवासीयांसह भारतीय चित्रपटांसाठी देखील अडचणींचे वर्ष ठरले आहे. गेल्या 10 महिन्यांपासून सिंगल स्क्रीन किंवा मल्टीप्लेक्स (Single Screen Cinema Hall) बंद असल्याने त्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अवलंबून असलेल्या लाखो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. जसे एखाद्या वाहनासाठी इंधन गरजेचे असते तसेच चित्रपटगृहांसाठी चित्रपट. त्यामुळे सातत्याने चित्रपट प्रदर्शित झाले नाही तर सिनेमागृहे चालवणे अशक्य आहे. एक दशकाहून अधिक काळ आपल्या चित्रपटांमुळे प्रेक्षक सिंगल स्क्रिन चित्रपटगृहांकडे वळत होते. परंतु, आता आशयाचा अभाव असल्यामुळे प्रेक्षकांना आनंद मिळत नसल्याने ते आता या चित्रपटागृहांकडे पाठ फिरवत आहेत.
तुमच्या राधे : युवर्स मोस्ट वाण्टेड भाई या आगामी चित्रपटामुळे देशभरातील सिंगल स्क्रिन चित्रपटगृहांना संजीवनी मिळू शकते. हा चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रदर्शित झाला तर चित्रपटगृहांचे मालक आणि कर्मचाऱ्यांना अर्थिक पाठबळ तर मिळेल तसेच भविष्याबाबत एक आशेचा किरण देखील गवसेल. त्यामुळे आम्ही आपल्याला विनंती करतो की 2021 मधील ईदला प्रत्येक चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी योजना आखावी. यापेक्षा चांगली ईदी आम्हा चित्रपटगृह मालकांना अन्य काही असू शकत नाही.
आतापर्यंतची स्थिती पाहता चित्रपटगृहात गेल्याने कोणत्याही व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्याची नोंद जगभरात नाही. आम्हा खात्री आहे की प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन तुमचे चाहते करतील. लाखो भारतीय आणि चित्रपटगृहांमध्ये काम करणारे कामगारांच्यावतीने आम्हाला खात्री आहे की मे 2021 हा महिना तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना खूप सारे प्रेम, आनंद आणि समृध्दी देईल' असे या पत्रात म्हटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Salman khan