EXCLUSIVE: रियाने ब्लॉक केला होता सुशांतचा नंबर, 8 ते 14 जूनपर्यंतचे कॉल डिटेल्स आले समोर
न्यूज 18 ला मिळालेल्या एक्सक्लूझिव्ह माहितीनुसार रिया आणि सुशांतचे कॉल डिटेल्स समोर आले आहेत. यातून असे समोर आले आहे की रियाने सुशांतचा नंबर ब्लॉक केला होता.
मुंबई, 06 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death) अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. न्यूज18 ला मिळालेल्या एक्सक्लूझिव्ह माहितीनुसार रिया आणि सुशांतचे कॉल डिटेल्स समोर आले आहेत. यातून असे समोर आले आहे की रियाने सुशांतचा नंबर ब्लॉक केला होता. त्या दोघांमध्ये 8 ते 14 जून दरम्यान कोणतेही फोन कॉल्स झाले नव्हते. 14 जून रोजी सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती.
या दरम्यान रियाने सुशांतमधील नाते दुरावले असल्याची माहिती समोर येत आहे. सुशांत जेव्हा 20 ते 24 जानेवारी दरम्यान चंदीगडमध्ये गेला होता, त्यावेळी तिने त्याला 25 कॉल्स केले होते. मात्र जानेवारीनंतर दोघांमध्ये बातचीत कमी झाली होती. अखेरीस जूनमध्ये तिने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. दरम्यान 8 ते 14 जून दरम्यान ना रियाने त्याला मेसेज केला होता ना कॉल. रियाने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. सुशांतची या दरम्यान त्याच्या बहिणी मितू सिंह आणि श्वेता सिंहशी बातचीत झाली होती.
या कॉल डिटेल्समधून आणखी एक माहिती समोर येत आहे, ती म्हणजे शेवटी सुशांतने बिझनेस मॅनेजरशी फोनवरून बातचीत केली होती. 14 जून रोजी एका स्क्रिप्ट संदर्भात दोघांमध्ये बातचीत झाली होती. या मॅनेजरचे नाव उदय सिंह असून त्यांच्यामध्ये 368 सेकंद बातचीत झाल्याची बाब या कॉल डिटेल्समधून समोर येत आहे.
दरम्यान या प्रकरणात आता केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBI च्या चौकशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहेत. सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सांगितलं की, बिहार सरकारने या प्रकरणाची CBI चौकशीची शिफारस केली होती. केंद्राने बिहार सरकारची शिफारस मान्य केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी CBI करणार आहे.
मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सुशांत सिंह राजपूतचे वडील वडील के.के. सिंह यांच्या विनंतीवरून अभिनेत्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल केली होती. सुशांतला कुटुंबीयांपासून दूर ठेवल्याचा, त्याच्या खात्यातून 15 कोटी रुपये काढल्याचा त्याचप्रमाणे त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी केली होता. दरम्यान आता हे कॉल डिटेल्स समोर आल्याने रियासमोरील संकटात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) अंमलबजावणी संचलनालयाने (Enforcement Department ED) समन्स बजावून 7 ऑगस्ट रोजी चौकशीकरता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडीच्या मुंबई कार्यालयामध्ये ही चौकशी होणार आहे. दरम्यान आज रियाचा सीए रितेश शाहची देखील ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान याआधीही रितेशला समन्स बजावण्यात आले होते, मात्र तो चौकशीला सामोरे गेला नव्हता. याआधी रियाचा जवळचा मित्र ज्याचे बिहार पोलिसांच्या एफआयआरमध्ये नाव आहे, त्या सॅम्युअल मिरांडाची देखील ईडीने चौकशी केली होती. तर सुशांत सिंह राजपूतचा सीए श्रीधरची देखील ईडीने चौकशी केली आहे.