नवी दिल्ली, २० एप्रिल- निवडणूक आयोगाने मोदी यांच्या आयुष्यावर तयार करण्यात आलेल्या ‘मोदी जर्मी ऑफ अ कॉमन मॅन’ वर बंदी घातली आहे. आयोगाने निर्मात्यांना ऑनलाइन कंटेट काढून टाकण्याचा आदेश दिला.
निवडणूक आयोगाने शनिवारी एक पत्रक प्रसिद्ध करत निर्मात्यांना वेब सीरिजशी निगडीत सर्व माहिती तातडीने हटवण्याचे आदेश दिले. आयोगाने स्पष्ट केले की, १७ मार्चला लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे आचार संहितेचं उल्लंघन होईल असा मीडियाचा वापर केला जाऊ शकत नाही.
‘आमच्या हे लक्षात आले आहे की, वेब सीरिज ‘मोदी- जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’चे पाच एपिसोड पोर्टलवर उपलब्ध आहेत. तातडीने याचं ऑनलाइन स्ट्रीमिंग बंद करावं तसंच पुढील आदेश मिळेपर्यंत या सीरिजशी निगडीत सर्व माहिती काढून टाकण्यात यावी,’ असे आदेश नोटीसमध्ये देण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. यात पंतप्रधानांच्या लहानपणापासून ते तरुण वयातील प्रसंगांपासून पंतप्रधान पदी विराजमान होईपर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
ही वेब सीरिज सेन्सॉर बोर्डाचे सदस्य मिहिर भूता आणि राधिका आनंद यांनी लिहिली असून ओह माय गॉड सिनेमाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. ग्रामीण गुजरातच्या सिद्धपुर आणि वडनगर येथे सीरिजचं शूटिंग करण्यात आलं.
याआधी निवडणूक आयोगाने विवेक ओबेरॉय स्टारर पीएम नरेंद्र मोदी या सिनेमावर बंदी घातली होती.