मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Indian Women Rising; चित्रपटसृष्टीत महिलांसाठी मोठं व्यासपीठ उपलब्ध

Indian Women Rising; चित्रपटसृष्टीत महिलांसाठी मोठं व्यासपीठ उपलब्ध

Indian women raising - News18 lokmat

Indian women raising - News18 lokmat

एकता कपूर (Ekta Kapoor), गुणित मोंगा आणि ताहिरा कश्यप-खुराना या तिघींनी हे व्यासपीठ दिलं आहे, त्याचा नेमका काय फायदा होणार आहे पाहा.

नवी दिल्ली, 22 जानेवारी: एकता कपूर (Ekta Kapoor), गुणित मोंगा आणि ताहिरा कश्यप-खुराना या चित्रपट क्षेत्रातल्या नामवंत तिघींनी एकत्र येऊन गुणवान महिला चित्रपटकर्त्यांना पुढे आणण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध केलं आहे. 'इंडियन वूमन रायझिंग' (Indian Women Rising) या नावाने त्यांनी सिनेमा कलेक्टिव्हची (Cinema Collective) घोषणा केली आहे. सिनेमा क्षेत्रातल्या टॅलेंटेड महिलांना पुढे आणण्यासाठी, तसंच महिलांच्या कथा मांडण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

या तिघींनीही 'कंटेंट इज क्वीन' या नावाने आपापल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून याबाबत पोस्ट केल्या होत्या आणि आता या तिघींनीही या प्रकल्पाची घोषणा सोशल मीडियावरून केली आहे. 'महिलांचं, महिलांकडून आणि महिलांसाठी चालवलं जाणारं व्यासपीठ' असं वर्णन या तिघींनीही केलं आहे.

एकता कपूर  ही भारतीय सिनेविश्वातल्या सर्वांत यशस्वी महिला फिल्ममेकर्सपैकी एक. टीव्ही, सिनेमा आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स अशा सर्वच माध्यमांमध्ये तिचा अनुभव दांडगा आहे. बालाजी टेलिफिल्म लिमिटेड, बालाजी मोशन पिक्चर्स आणि आल्ट बालाजी या संस्थांची एकता कपूर ही सह-व्यवस्थापकीय संचालक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे. तिला कंटेंटची सम्राज्ञी मानलं जातं.

एकता कपूरने सांगितलं की, "जेव्हा गुणीत आणि ताहिराने ही संकल्पना माझ्यापुढे मांडली, तेव्हा मी ती तातडीने स्वीकारली. या माध्यमातून अधिकाधिक महिला दिग्दर्शकांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल"

हे वाचा - प्रेक्षकांना घायाळ करायला 'महाराष्ट्राची लावण्यवती' सज्ज! पाहा क्षणचित्र

गुणीत मोंगा (Guneet Monga) ही केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात कीर्ती मिळालेली गुणवान फिल्ममेकर आहे. सिख्य एंटरटेन्मेंटची ती संस्थापक आहे. अकादमी अॅवॉर्डसह अनेक मानाचे पुरस्कार तिला मिळालेले आहेत. तिच्या प्रोजेक्ट्समधल्या आशयाच्या (Content) गुणवैशिष्ट्यांमुळेच तिला हे यश मिळालं आहे.

'फिल्मी बीट'च्या वृत्तानुसार, गुणीत मोंगाने सांगितलं,  "सध्या भारतात एकूण चित्रपट दिग्दर्शकांपैकी केवळ पाच टक्के दिग्दर्शक महिला आहेत. 'इंडियन वमन रायझिंग' या उपक्रमातून आम्ही या क्षेत्रात स्वतंत्रपणे काम करणाऱ्या महिला दिग्दर्शकांना, फिल्ममेकर्सचं काम व्यापक स्तरावर नेणार आहोत"

हे वाचा - अमिताभ बच्चन यांनी अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांच्यावर केलेली कमेंट SEXIST?

ताहिरा (Tahira Kashyap-Khurrana) ही बेस्ट-सेलिंग लेखिका, स्तंभलेखिका आणि चित्रपट दिग्दर्शिका आहे. कर्करोगावर तिने यशस्वीपणे मात केलेली आहे. त्यामुळे ती स्वतः एक प्रेरणास्रोत आहे आणि महिला सबलीकरणाचं प्रतीक म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. 'दी ट्वेल्व्ह कमांडमेंट्स ऑफ बीइंग ए वूमन' हे तिचं अलीकडचं पुस्तक आहे.

ताहिराने 'फिल्मीबीट'ला सांगितलं की, "एकाच साच्याच्या भूमिकांसाठी महिलांना गृहीत धरलं जातं. या चौकटी मोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत."

साधारण दोन वर्षांपूर्वी मल्याळम् सिनेमातील व्यक्तींनी 'वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह' हा उपक्रम सुरू केला होता. स्पुतनिक इंटरनॅशनलने त्याबाबतचं वृत्त दिलं होतं. सिनेमा क्षेत्रात महिलांसाठी सुरक्षित जागा तयार करण्याच्या उद्देशाने तो उपक्रम सुरू करण्यात आला होता. 'इंडियन वुमन रायझिंग' हे त्याच दिशेने पुढे टाकलेलं पाऊल आहे.

First published:

Tags: Bollywood