मुंबई, 16 ऑगस्ट : तरुणाईला ज्या जोडीने नाटकाकडे खेचलं ती म्हणजे केदार शिंदे (Kedar Shinde) आणि भरत जाधव (Bharat Jadhav). मराठी नाट्य इतिहासात या जोडीच्या 'सही रे सही'ला मानाचे स्थान आहे. एक काळ 'सही रे सही' ने गाजवला आहे. दरम्यान सही रे सहीला 15 ऑगस्ट रोजी 18 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त नाटकाचा दिग्दर्शक केदार शिंदे याने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने हे नाटक, त्यामध्ये असणारी त्याची पडद्यामागील भूमिका, भरतची व्यासपीठावरील भूमिका याबाबत भाष्य केले आहे. सही रे सहीला केदारने 'मी, भरत आणि अंकुशच्या मैत्रिचे प्रतिबिंब' म्हटले आहे.
केदार शिंदेची ही विशेष पोस्ट सोशल मीडियावर अनेकांची वाहवा मिळवत आहे. केदारने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, '18 वर्ष आज पूर्ण होत आहेत. 15.08.2002 रोजी हा 'सही' रथ ज्या भरधावाने निघाला तो अजूनही त्याच वेगात आहे. मला अजूनही आठवतो तो दिवस. माझ्या टाटा इंडिका गाडीतून मी आणि भरत, शिवाजी मंदिरच्या दिशेने निघालो... तेव्हा एकच गोष्ट मी भरतला वारंवार सांगत होतो. 'भरत आज दिवस तुझा आहे. जे जे आजपर्यंत करावसं वाटत होतं, ते साकार करण्याचा आजचा दिवस आहे. मी पडदा उघडल्यावर पडद्यामागे असणार. रंगमंच तुझा असणार आहे. त्यामुळे बागड त्या रंगमंचावर! आपल्या आण्णांनीच तो रंगमंच बांधलाय असं समज!' आणि.... भरत जाधव याने परत परत परत परत तेच केलं. तब्बल 18 वर्ष.'
(हे वाचा-Birthday Special : सैफ अली खान पद्मश्री पुरस्कार करणार होता परत, हे होतं कारण)
केदारने या नाटकाला स्वत:ची मुलगी संबोधले आहे. त्याने पुढे असे लिहिले आहे की, 'या संपूर्ण प्रवासात त्याच्या सोबत त्याच तडफेने काम करणारे कलाकार आणि पडद्यामागचे तंत्रज्ञ... त्यांचं प्रेम अजूनही या जादुई नाटकावर तेवढच आहे आणि तेवढच राहील. मी मुलीच्या बापाच्या भुमिकेत होतो आणि राहीन! आपण लाडाने प्रेमाने मुलीला वाढवायचं आणि योग्य वेळी तीचं लग्न लावल्यावर तीचा सुखाचा संसार पाहायचा! या दरम्यान मुलीला काही अडचण,त्रास झाला तर वेळोवेळी तत्परतेने पाठीशी उभंही राहायचं. माझ्या या मुलीचं लग्न भरत जाधव या कर्तव्यतत्पर मुलाशी लावलं. या दरम्यान 'सासवा' बदलल्या. मुलीला आणि भरतलाही त्याचा त्रास झाला. पण नेटाने त्याने संसार केला. आणि आता तर त्याने स्वत:चा संसार थाटलाय. खुप समाधान वाटतं!!!!'
(हे वाचा-SSR Death Case : नवी बाजू समोर, पार्थिवाजवळ 'त्या' तरुणाला भेटली 'मिस्ट्री गर्ल')
केदारने असे म्हटले आहे की जेव्हा भरतला कंटाळा येईल तेव्हाच हे नाटक थांबेल पण ते होईल असं वाटत नाही. कोरोनामुळे कलाकार तंत्रज्ञानांचे होणाऱ्या नुकसानाबाबतही त्याने लिहिले आहे. 'सही' हा त्यावर जालीम इलाज असल्याचे केदार म्हणाला.
(हे वाचा-Tarak Mehta Ka Ooltah Chashmah: मालिकेत होणार या दिग्गज अभिनेत्याची एंट्री)
या नोटच्या शेवटी त्याने आणखी एका कलाकाराचे नाव आवर्जून घेतले आहे ते म्हणजे अंकुश चौधरी (Ankush Chaudhari). त्याने असे म्हटले की, 'श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अशी कलाकृती माझ्या हातून घडली. पण यात माझ्या पाठीमागे असणारे स्वामी होतेच, पण त्या सोबत अजून एक व्यक्ती होती, माझा मित्र अंकुश चौधरी. मी,भरत,अंकुश या तिघांच्या मैत्रीचं प्रतिबिंब म्हणजे. 'सही' #लवकरचभेटू'