जेव्हा दिलीप कुमार यांच्यावर झाला होता पाकिस्तानी 'हेर' असल्याचा आरोप

जेव्हा दिलीप कुमार यांच्यावर झाला होता पाकिस्तानी 'हेर' असल्याचा आरोप

प्रसिद्ध पत्रकार रशीद किडवई यांनी भारतीय नेते आणि बॉलिवूडच्या अभिनेत्यांच्या संबंधांवर 'नेता अभिनेता : बॉलीवूड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स' हे पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकात नेते, अभिनेते आणि त्यांच्या किस्स्यांच्या अनेक रोचक आठवणी सांगितल्या आहेत.

  • Share this:

मुंबई : विख्यात अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर 1960 च्या दशकात पाकिस्तानचे हेर असल्यचा आरोप झाला होता. या संशयावरून त्यावेळच्या कलकत्ता (आता कोलकता) पोलिसांनी दिलीप कुमारांच्या मुंबईतल्या घरावर छापाही घातला होता. मात्र त्यात त्यांना काहीच हाती लागलं नाही. या घटनेने दिलीप कुमार प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्या धक्क्यातून बाहेर यायला त्यांना खूप दिवस लागले. प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक रशीद किडवई यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात ही आठवण सांगितली आहे. किडवई यांनी भारतीय नेते आणि बॉलिवूडच्या अभिनेत्यांच्या संबंधांवर 'नेता अभिनेता : बॉलीवूड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स' हे पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकात नेते, अभिनेते आणि त्यांच्या किस्स्यांच्या अनेक रोचक आठवणी सांगितल्या आहेत.

दिलीप कुमार पाकिस्तानी हेर?

1960 मध्ये 'गंगा-जमुना' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर कलकत्ता पोलिसांनी दिलीप कुमारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी छापा टाकला. पोलिसांच्या या अनपेक्षीत कृतीनं देशभर खळबळ उडाली. कलकत्ता पोलिसांनी असा खुलासा केला की त्यांनी एका पाकिस्तानी एजंटला अटक केली होती. आणि त्याच्याकडून जप्त केलेल्या डायरीत काही अभिनेत्यांची नावं लिहिली होती. त्या यादीत एक नाव होतं अभिनेते दिलीप कुमार यांचं. त्या संशयावरून त्यांनी दिलीप साहेबांच्या घरावर छापा टाकला. पण त्यांना रिकाम्या हाताने परत जावं लागलं. कारण केवळ संशयावर पोलिसांनी छापा टाकला होता.

यात सगळ्यात वेदनादायक भाग होता तो तत्कालीन कलकत्ता पोलिसांनी केलेल्या युक्तिवादाचा. पोलिसांच्या एका चुकीमुळे मात्र या दिग्गज अभिनेत्याच्या आयुष्यात वादळ निर्माण झालं होतं. या वादावर पत्रकार वीर संघवी यांनी एका लेखात पोलिसांच्या कृतीवर जोरदार कोरडे ओढले. ते लिहितात '' पोलिस किती गाढवपणे आणि पूर्वग्रह दुषित मानसिकतेनं काम करतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे.

अभिनेत्याचं दु:ख

देशातला विख्यात अभिनेता. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याशी त्यांचा असलेला थेट परिचय असं असतानाही केवळ डायरितल्या नावामुळं त्यांना या अपमानास्पद प्रसंगाला सामोरं जावं लागलं. केवळ धर्मानं मुस्लिम असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ही कारवाई केली होती'' असा आरोपही संघवी यांनी आपल्या 'रिडीफ'मध्ये लिहिलेल्या लेखात केला. त्या डायरीमध्ये देवानंद यांचं नाव असतं तर पोलिसांनी अशीच कारवाई केली असती का असा सवालही संघवी यांनी आपल्या लेखात केलाय.

काही महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांना कुठलाही पुरावा मिळाला नाही. पण तोपर्यंत सर्वत्र अफवा पसरल्या होत्या की दिलीप कुमारांनी गुन्हा कबूल केलाय. पोलिसांना त्यांच्या घरात रेडिओ ट्रान्सफॉर्मर सापडला. दिलीप कुमार हे बॉलिूडमधल्या मुस्लिम हेरांचा मोऱ्हक्या आहे इथपर्यंत अफवांचं पेव फुटलं होतं.

दिलीप कुमार हे पाकिस्तानी हेर आहेत यावर विश्वास तरी कसा बसू शकतो असा प्रश्नही संघवी यांनी विचारलाय. ते पुढं लिहितात. ''एवढं झाल्यावरही दिलीप साहेबांनी सर्व वादळ पचवलं. त्याचा कडवटपणा त्यांनी कुठेही आपल्यामध्ये येवू दिला नाही. असं वातावरण असतानाही दिलीप साहेबांनी 1965 च्या युद्धात पाकिस्तान विरोधात भूमिका घेत सीमेवर जाण्याचीही तयारी दाखवली होती.''

बाळासाहेबांशी दुरावा

दिलीप साहेबांनी आपल्या आयुष्यात अशी अनेक वादळं अनुभवली आणि पचवलीही पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान स्वीकारण्यावरूनही असंच वादळ निर्माण झालं होतं. आणि हे वादळ निर्माण करणारे होते दिलीप साहेबांचे जीवलग मीत्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब आणि दिलीप साहेबांचा अनेक दशकांचा स्नेह. मधली 1998 आणि 1999 ही दोन वर्ष सोडली तर दोघांमधला हा स्नेह बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसांपर्यंत कायम होता. दिलीप कुमार यांची काँग्रेसशी जवळीक आहे हे माहित असतानासुद्धा त्यांच्यामध्ये कधी दुरावा निर्माण झाला नव्हता. तो आला झाला.

दिलीप साहेबांची पाकिस्तानबाबत विरोधाची भूमिका माहित असूनही पाकिस्तान सरकारने त्यांना त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान 'निशान ए इम्तियाज' जाहीर केला. तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी पाकिस्तानात जाण्यासही दिलीप साहेबांनी होकार दिला. आपल्या जीवलग मित्राचा हा निर्णय ऐकल्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला तीव्र विरोध केला. दिलीप कुमारांनी हा पुरस्कार नाकारून पाकिस्तानात जावू नये असं बाळासाहेबांचं मत होतं तर मानवतेच्या भूमिकेतून शांती आणि सौहार्दासाठी मी हा पुरस्कार स्वीकारला अशी भूमिका दिलीप साहेबांनी घेतली होती. त्यावरून राजकीय वादळही निर्माण झालं. एक कलाकार आणि व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेबांनी केवळ धर्मावरून आपल्या देशभक्तिबद्दल शंका घ्यायला नको होती असं मतही दिलीप साहेबांनी आपल्या आत्मचरित्रात व्यक्त केलं होतं.

वाजपेयींची मदत

या वादानंतर दिलीप कुमारांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा सल्ला घेतला होता. कवी मनाच्या वाजपेयींनी दिलीप साहेबांच्या निर्णयाचं समर्थन केलं आणि त्यांना पाकिस्तानात पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाण्यालाही संमती दर्शवली. या वादाचे परिणाम माध्यमांमध्येही उमटले. तत्कालीन पत्रकार आणि चित्रपटांविषयी लिखान करणारे मोहन दीप यांनीही आपल्या लेखांमधून दिलीप कुमारांच्या निर्णयाला विरोध केला होता. दिलीप कुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारलाच कसा याचं मला आश्चर्य वाटतं असं त्यांनी आपल्या लेखात लिहिलं होतं. पाकिस्तानने फक्त दिलीपकुमार यांचीच या पुरस्कारासाठी निवड का केली? असा सवालही त्यांनी केला होता.

हा विरोध होत असताना त्यांना अनेकांनी पाठिंबाही दिला होता. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना पाठिंबा तर दिलाच पण बाळासाहेबांच्या टीकेकडे दुर्लक्षही करा असा सल्ला त्यांनी दिलीप साहेबांना दिला होता. 1998 मध्ये दिलीप कुमार हे सुनील दत्त यांना घेऊन पाकिस्तानात गेले आणि पुरस्कार स्वीकारला. त्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा वाद निर्माण झाला. पाकिस्तानने कारगिल वर आक्रमण केल्यानंतर बाळासाहेबांनी पुन्हा मागणी केली की दिलीप साहेबांनी पाकिस्तानचा पुरस्कार परत करावा. पण दिलीप साहेब आपल्या जुन्या भूमिकेवर ठाम राहिले. पुरस्कार परत केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये शांतता नांदणार नाही. हा पुरस्कार आपण मानवतेच्या भूमिकेतून स्वीकारल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

या कटुतेनंतर मात्र दोनही मित्रांचे संबंध पुन्हा सुरळीत तर झाले मात्र पूर्वीसारखा ओलावा त्यात राहिला नव्हता. शिवसेनेची स्थापना होण्याआधीपासून दिलीप कुमार हे बाळासाहेबांचे मित्र होतं. ते नुसते मित्रच नव्हते तर त्यांचे कौटुंबिक मित्र होते. बाळासाहेबांच्या पत्नी मिनाताई ठाकरे यांचं आदरातिथ्य आपण अनेकदा अनुभवलं असल्याची आठवणही त्यांनी आपल्या आत्मचरित्रात दिला आहे. 2012 मध्ये जेव्हा बाळासाहेबांच निधन झालं त्यावेळी दिलीप कुमारांनी दिलेली प्रतिक्रीया दोघांमध्ये मैत्रिची साक्ष देणारी आहे. त्यांनी म्हटलं होतं " बाळासाहेबांना त्यांचे कार्यकर्ते 'वाघ' वाटतं असतं आणि राजकीय क्षेत्रातही त्यांची तशीच ओळख होती. बाळासाहेब हे 'वाघ' नव्हते तर 'सिंह' होते. त्यांनी 'सिंहा'पेक्षाही अधिक राजसपणे आपलं आयुष्य व्यतित केलं"

 

First published: October 3, 2018, 5:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading