पेशावर, 11 डिसेंबर : हिंदी चित्रपटसृस्ष्टीतील ट्रॅजिडी किंग दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार (Tragedy King DilipKumar)यांचा आज वाढदिवस (Birthday) आहे. आज ते 99 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आपल्या अभिनयाने भारतीयांबरोबरच जगाला वेड लावणाऱ्या दिलीपकुमार यांना उंदड आयुष्य लाभो. त्यांच्या वाढदिवशी पाकिस्तानातून एक चांगली बातमी आली आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तुनख्वा प्रांतात पेशावरमध्ये (Peshawar) असलेल्या दिलीपकुमार यांच्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील शोमॅन, अभिनेते, दिग्दर्शक दिवंगत राज कपूर (Showman Raj Kapoor) यांच्या कौटुंबिक घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. दिलीप कुमार आणि राज कपूर यांचा जन्म पेशावरमध्ये झाला होता आणि त्यांचं बालपण या कौटुंबिक घरांतच गेलं होतं. ब्रिटिशांनी भारताची फाळणी करून देशाला स्वातंत्र्य दिल्यानंतर ही दोन्ही कुटुंब स्वतंत्र भारतात स्थायिक झाली होती. नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत (Bollywood) या दोघांनी आपली कारकीर्द घडवली आणि उत्तुंग शिखर गाठलं.
इतकी ठरली किंमत
ही दोन्ही घरं सध्या खूपच जीर्ण अवस्थेत आहेत. पेशावरमधील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या घरांच्या अवस्थेबद्दल या आधीही अनेकदा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात या दोन्ही ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारती जतन करण्यासाठी सध्याच्या मालकांकडून त्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या इमारतींना पाकिस्तानचा राष्ट्रीय ठेवा घोषित करण्यात आलं आहे. कम्युनिकेशन अँड वर्क्स डिपार्टमेंटच्या एका रिपोर्टनंतर पेशावरचे उपायुक्त मोहम्मद अली असगर यांनी सांगितलं की दिलीप कुमार यांचं घराचं क्षेत्रफळ चार मारला (1 मारला = 272.25 स्क्वेअर फूट) असून त्याची किंमत 80.65 लाख रुपये निश्तिच करण्यात आली आहे, असं ‘एबीपी लाइव्ह’च्या वृत्तात म्हटलं आहे. तर राज कपूर यांच्या घराचं क्षेत्रफळ सहा मारला इतकं असून त्याची किंमत 1.5 कोटी रुपये अशी निश्चित केली आहे.
हे वाचा-ती भेट शेवटची...मधुबाला यांना शेवटचं पाहताना पाणावले होते दिलीप कुमार यांचे डोळे
पुरातत्त्व विभाग घेणार काळजी
या ऐतिहासिक वारशांचं जतन पाकिस्तानचा पुरातत्त्व विभाग करणार असून ती खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी द्यावी अशी विनंती या विभागाने सरकारला केली आहे. या इमारतींची डागडुजी करून ती त्यांना पूर्वीच स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि या दिग्गज अभिनेत्यांच्या आठवणीही जागवल्या जातील, असं पाकिस्तानच्या सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे.
दिलीप कुमार यांची प्रदीर्घ कारकीर्द
दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 ला पेशावरमध्ये झाला. त्यांनी 1944 मध्ये ज्वार भाटा या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दित त्यांनी 65 चित्रपटांत काम केलं. दिलीपकुमार यांचा अभिनय असा होता की त्यांना अभिनयाचं विद्यापीठ म्हटलं जातं. नया दौर, मुघल-ए-आझम, राम और शाम, गंगा-जमुना, कर्मा सौदागर असे एकापेक्षा एक चित्रपट त्यांनी दिले. अभिनेत्री सायरा बानोशी त्यांनी निकाह केला. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान निशान-ए-इम्तियाझ देऊन गौरवण्यात आलं आहे.
हे वाचा-माझ्या सगळ्या माणसांना फोडू नका...' पंकजा मुंडेंचा रोहित पवारांना टोला
राज कपूर यांची कारकीर्द
राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 ला पेशावरमध्ये झाला. ते अभिनेते, दिग्दर्शक होते. त्यांनी 1935 मध्ये पहिल्यांदा इन्कलाब या चित्रपटात भूमिका केली होती. 1947 मध्ये आलेल्या नीलकमल चित्रपटातील नायकाच्या भूमिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. 1948 मध्ये त्यांनी मुंबईत स्वत: चा स्टुडिओ उभारला आणि दिग्दर्शन आणि निर्मितीत पाऊल टाकलं. आवारा, श्री420, जागते रहो, अनाडी, बूट पॉलिश, दिल ही तो है, मेरा नाम जोकर, संगम असे चित्रपट देऊन त्यांनी भारतीय प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता. 2 जून 1988 ला त्यांचं निधन झालं.