बिचित्र शर्मा, धर्मशाळा, 12 नोव्हेंबर: मनोरंजन विश्वासाठी 2020 या वर्षात सर्वाधिक धक्कादायक घटना घडल्या आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दरम्यान धर्मशाळामधून (Dharmashala, Madhya Pradesh) आणखी एक धक्कादायक घटना समोर येते आहे बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा (Asif Basra) यांनी आत्महत्या (Suicide Case) केली आहे. कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळामध्ये मॅक्डोलगंज हे थंड हवेचे ठिकाण आहे. याठिकाणच्या जोगिबाडा रोडवर असणाऱ्या एका कॅफेजवळ गुरुवारी त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचं ठोस कारण अद्याप समजलं नाही आहे. कांगडाचे एसपी विमुक्त रंजन (Kangra SP) यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. वयाच्या 53 व्या वर्षी अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. अशी माहिती मिळते आहे की, आसिफ बसरा गेल्या 5 वर्षांपासून मॅक्डोलगंज मध्ये भाड्याच्या घरात राहत होते, त्यांच्याबरोबर त्यांची एक विदेशी मैत्रिण देखील राहत असे.
गळफास घेऊन उचललं टोकाचं पाऊल...
अशी माहिती मिळते आहे की, आसिफ बसरा UK मधील एका महिलेबरोबर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. गुरुवारी दुपारी ते त्यांच्या कुत्र्याला फिरवून आणण्यासाठी बाहेर गेले होते. घरी आल्यानंतर त्याच कुत्र्याच्या दोरीने त्यांनी गळफास घेतला. अशी प्राथमिक माहिती मिळते आहे की, गेल्या काही काळापासून ते नैराश्याचा सामना करत होते. कांगडाचे एसपी विमुक्त रंजन यांनी या प्रकरणाची पुष्टी केली असून पोलीसया प्रकरणाचे सखोल चौकशी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोण आहेत आसिफ बसरा?
आसिफ बसरा एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. ‘परजानियां’ ब्लॅक ‘फ्रायडे’ याबरोबच त्यांनी अमेरिकन कॉमेडी सिनेमा आउटसोर्समध्ये देखील काम केले होते. हिमाचली सिनेमा सांझमधील त्यांचा अभिनय विशेष गाजला होता. 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' या सिनेमात त्यांनी अभिनेता इम्रान हाश्मीच्या वडिलांची भूमिका साकारली होती.