आपल्याला कलाकारांचं स्टारडम दिसतं. पण त्यामागे त्यांनी बराच संघर्ष केलेला असतो. अभिनयासारख्या अस्थिर विश्वात काम करताना हा अभिनेता घर चालवण्यासाठी कल्याणमध्ये रिक्षा चालवतो.
मुंबई, 26 डिसेंबर: देवमाणूस (Devmanus) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेत जवळजवळ सगळेच कलाकार तसे नवोदित पण त्यांच्या उत्तम अभिनयाने त्यांनी सगळ्यांचीच मनं जिकूंन घेतली. या कलाकारांनी नुकतीच चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी कलाकारांनी त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यातील काही मोकळे क्षण तर घालवलेच शिवाय आपल्या आयुष्यातील घडामोडींबद्दलही ते व्यक्त झाले.
देवमाणूस या मालिकेत ‘बज्या’ ही भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे, ‘किरण डांगे.’ (Kiran Dange) किरणची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची होती. त्याने आपल्या करिअरमधील संघर्षाची कहाणी चला हवा येऊ द्या च्या मंचावर सांगितली. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे तो कल्याणमध्ये रिक्षा चालवतो. आपल्याला या कलाकारांचं स्टारडम दिसतं पण या कलाकारांनी केलेला संघर्ष बरेचदा लक्षात येत नाही. किरणने सांगितलेल्या त्याच्या कहाणीमुळे चला हवा येऊ द्या च्यामंचावरील अनेकांचे डोळे पाणावले.
किरणने एक छानशी पोस्ट शेअर करत चला हवा येऊ द्या मध्ये जाण्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. किरण लिहीतो,’ शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलना पासून , आपल्या चाळीतल्या गणपती पासून , पथनाट्य पासून, आज......आज सगळ्यांची लाडकी वाहिनी झी मराठीवरील ' देवमाणूस ' मालिके पर्यंत आणि आता नट म्हणून काम करताना आयुष्यात एकदा तरी आपल्याला महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वोत्तम व्यासपीठ ठरलेलं 'चला हवा येऊ द्या' येथे जायला मिळावं हे स्वप्न उराशी बाळगून दिवस-रात्र काम करणाऱ्या, महाराष्ट्रातल्या लाखो नटानं पैकी मी एक. आज मी त्या प्रत्येक माणसाचे आभार मानतो ज्या माणसाच्या कुठल्या ना कुठल्या मदतीमुळे , सपोर्टमुळे , विश्वासामुळे आज इथपर्यंत पोहोचलो. माझ्यासारख्या सर्व सामान्य घरातून नट होऊ इच्छिणाऱ्या सर्व मित्रांना इतकच सांगेन.तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुमच्या अडचणी तुमच्या अडचणींना सांगा तुमची स्वप्न.’