मुंबई, 10 एप्रिल : अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिचा आगामी सिनेमा 'छपाक'मुळे प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमातील दीपिकाचा फर्स्ट लूक शेअर समोर आल्यापासून दीपिकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका 'छपाक' सिनेमातील तिच्या लूकमध्येच दिल्लीमध्ये शॉपिंग करतानाही दिसली होती. त्यानंतर आता दिल्लीमध्ये बाइकवरून फिरतानाचा दीपिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओमध्ये दीपिकासोबत विक्रांत मेस्सीसुद्धा दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ प्रसिद्ध फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये दीपिका विक्रांत मेस्सीसोबत बाइकवरून येताना दिसते. यानंतर ही बाइक एका दुकानासमोर थांबते. विक्रांत रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला जाताना दिसतो. हा व्हिडीओ छपाकच्या शूटिंग सेटवरील असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
दिल्लीतील अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित 'छपाक' सिनेमा 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दीपिका या सिनेमामध्ये लक्ष्मीची भूमिका साकारत असून तिनं काही दिवसांपूर्वीच छपाकमधील तिचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. अभिनेता विक्रांत मेस्सी सिनेमामध्ये अलोक दीक्षित या सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकानं दिल्लीच्या जनपथ मार्केटमध्ये शॉपिंग करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी तिनं केलेल्या मेकअपमुळे अनेकजण तिला ओळखूही शकले नव्हते. छपाकचं दिग्दर्शन मेघना गुलजार करत असून या सिनेमातून लक्ष्मीचा जीवनपट आणि संघर्ष मांडला जाणार आहे. या सिनेमासाठी दीपिकासुद्धा खूप मेहनत घेत आहे.
एअर स्ट्राईक ते राफेल करार, मोदींची UNCUT मुलाखत