#boycottchhapaak ट्रेंड नंतर एकाही 'हीरो'नं नाही तर, 'या' अभिनेत्रींनी दीपिकाला दिला पाठिंबा

#boycottchhapaak ट्रेंड नंतर एकाही 'हीरो'नं नाही तर, 'या' अभिनेत्रींनी दीपिकाला दिला पाठिंबा

ट्वीटरवर #boycottchhapaak हॅशटॅग ट्रेंड करत आहे. पण बॉलिवूड अभिनेत्रींनी मात्र दीपिकाला पाठिंबा दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 08 जानेवारी : जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये झालेल्या मारहाण आणि हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहे. या हिंसाचाराविरोधात आता बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी रस्त्यावर उतरले असून स्टार अभिनेत्री दीपिका पदूकोणही जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांच्या भेटीला दाखल झाली आहे. दीपिकाने साबरमती हॉस्टेलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि झालेल्या प्रकाराविरोधात निषेध वर्तवला आहे. यावेळी दीपिकाच्याबरोबर कन्हैया कुमारही उपस्थित होता. दीपिका जेएनयूमध्ये गेल्याच्या बातम्या माध्यमांवर पसरल्यानंतर नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. छपाक सिनेमावर बंदी आणावी यासाठी सोशल मीडियावर दीपिका विरोधात ट्रोलिंग सुरू झालं आहे.

काही नेटकरी दीपिकाच्या विरोधात बोलत आहेत तर काही नेटकऱ्यांनी दीपिकाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ट्वीटरवर #boycottchhapaak आणि #ISupportDeepika असे दोन हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. छपाक सारखा सिनेमा करणारी दीपिका तुकडे-तुकडे गँगला भेटण्यासाठी गेली अशा टीका करत नेटकऱ्यांनी दीपिकाचा छपाक सिनेमा पाहू नका असा ट्रेंड सुरू केला आहे.

दीपिकानं जेएनयूमध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी तिच्या ‘छपाक’ सिनेमावर बहिष्कार घालण्याचं आव्हान सोशल मीडियावर केलं होतं. एकीकडे सोशल मीडियावर दीपिकाच्या सिनेमाला विरोध होत असतानाच  दुसरीकडे बॉलिवूडमधील सेलिब्रेटी दीपिकाच्या समर्थनार्थ ट्विटरवर ट्वीट करताना दिसत आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं लिहिलं, तुम्ही कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा देता हे महत्त्वाचं नाही. तुम्ही हिंसाचाराला पाठिंबा देत आहात का? तुम्ही जखमी झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे चेहरे पाहिलेत का? आपण आता हातावर हात घेऊन शांत बसू शकत नाही. दीपिकाच्या धाडसाचं कौतुक आणि ज्यांनी यावर आवाज उठवला त्या सर्वांचही. ही वेळ शांत बसण्याची नाही.

अभिनेत्री भूमि पेडणेकरनं दीपिकाला पाठिंबा देत लिहिलं, ‘तुला याच्याशी लढण्याची ताकद मिळो. छपाकच्या रिलीजची वाट पाहत आहे’

अभिनेत्री दिया मिर्झानंही दीपिकाला पाठिंबा दिला आहे. दियानं ट्वीट केलं, मी छपाक पहिल्या दिवसाचा पहिला शो पाहणार आहे. दीपिकाला शुभेच्छा…

अभिनेत्री स्वरा भास्करनं सुद्धा दीपिकाच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे. तिनं लिहिलं, ‘हे खूप चांगलं आहे.’ तर अभिनेत्री रिचा चढ्ढानं ट्वीट केलं, ‘शाब्बास’

बॉलिवूड अभिनेत्री सिमी ग्रेवलनं लिहिलं, दीपिका तुझी कमिटमेंट आणि धाडसाचं कौतुक करते. तू एक हिरो आहेस.

दिग्दर्शक अनुराग कश्यपनं लिहिलं, ‘एक महिला नेहमीच ताकदवान असते आणि ती नेहमीच राहिल. जे लोक हिंसेच्या विरोधात आहेत. त्या सर्वांनी छपाक सिनेमाच्या पहिल्या शोची सर्व तिकिटं बुक करायला हवीत. मौनातून उत्तर देण्याची वेळ आली आहे आणि हे सर्वात परिणामकारक ठरेल.’

अनुराग कश्यपनं त्याच्या दुसऱ्या एका ट्वीटमध्ये लिहिलं, दीपिका या सिनेमाच प्रमुख भूमिकेत तर आहेच पण यासोबतच ती या सिनेमाची प्रोड्युसर सुद्धा आहे हे विसरता नये. दीपिकानं खूप मोठी रिस्क घेतली आहे. दीपिकाबाबत माझ्या मनात खूप आदर आहे.

छापाक सिनेमातील मुख्य कलाकार विक्रांत मेस्सीनंही दीपिकाला पाठिंबा दिला आहे. त्यानं त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘दीपिका तुझा अभिमान वाटतो.’ यासोबत त्यानं दीपिकाचा जेएनयू कॅम्पसमधील फोटो शेअर केला आहे.

संगीतकार विशाल ददलानी यानंही याबाबत ट्वीट केलं आहे. ‘दीपिका पदुकोणला पूर्ण पाठिंबा आणि धन्यवाद... हे धाडस करण्यासाठी कारण बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असं करण्याचं धाडस करत नाहीत. जे लोक छपाक सिनेमावर बहिष्कार घालण्याचा ट्रेंड करत आहे. ते लोक एका बहादूर महिलेला रोखू शकत नाही. छपाक नक्कीच ब्लॉकबास्टर ठरेल.’

याव्यतिरिक्त JNU मध्ये झालेल्या हल्ल्याचा याआधीही अनिल कपूर, आलिया भट, राजकुमार राव, ट्विंकल खन्ना, अनुराग कश्यप आणि सोनम कपूर यांनी निषेध केला होता. या हल्ल्याला सर्वांनीच भ्याड, भीतीदायक आणि निर्दयी म्हटलं आहे. असा भ्याड हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2020 05:16 PM IST

ताज्या बातम्या