मुंबई, 13 एप्रिल : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह नोव्हेंबर 2018मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नाला काही महिने उलटत नाहीत तोपर्यंत प्रियांका चोप्रानंतर आता दीपिका पदुकोणही गरोदर असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू होत्या. त्यावर नुकतीच दीपिका पदुकोणनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकानं सांगितलं अशा प्रकारच्या अफवा पसरवणं बंद करा. जे व्हायचं त्यावेळी होईल पण लोकांनी आमच्यावर अशाप्रकारचा दबाव टाकणं बद करावं
डीएनएच्या वृत्तानुसार, आई बनण्याबाबत दीपिका म्हणाली मी जेवढ लोकांकडून ऐकलं आहे. मातृत्व हे लग्नांनंतरचं सर्वात मोठं सुख आहे. यात कोणतीही शंका नाही मी एक ना एक दिवस आई बनणारच आहे. पण मला वाटतं महिलांवर लग्नानंतर लगेचच आई बनण्यासाठी दबाव टाकला जाऊ नये. तसेच त्यांना हा प्रश्न विचारू नये की तू आई कधी बनणार आहेस. ज्या दिवशी आपण हा प्रश्न विचारणं बंद करू त्या दिवशी सर्वत्र बदल व्हायला सुरुवात होईल.
दीपिका पदुकोण सध्या दिल्लीमध्ये मेघना गुलजारच्या छपाक सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित असून दीपिका यात लक्ष्मीच्या भूमिकेत दिसणार आहे. यात दीपिका नाव मालती असून दीपिकाच्या फर्स्ट लूकला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. लग्नानंतर दीपिकाचा हा पहिलाच सिनेमा आहे. तर रणवीर सिंबा आणि गली बॉय नंतर आता ‘83’ या क्रिकेटपटू कपिल देव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.