मुंबई, 02 फेब्रुवारी : जेएनयुमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांना भेटायला गेल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. तिला ट्रोल करताना तिची प्रमुख भूमिका असलेल्या छपाक सिनेमावर बहिष्कार घालण्याची चर्चाही सोशल मीडियावर सुरू झाली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याआधी दीपिकाने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आय़ुष्याबद्दल काही गोष्टी शेअर केल्या होत्या.
छपाक चित्रपटाबद्दल बोलताना दीपिका म्हणाली की, जेव्हा या सिनेमाची स्क्रिप्ट ऐकली तेव्हा भावनिक झाले होते. तेव्हा दीपिका म्हणून नाही तर लक्ष्मीसारख्या भावना मनात होत्या. तिचं दु:ख समजून घेऊ शकत होते. सर्व चित्रपट बॉक्स ऑफिससाठी नसतात तर काही चित्रपट हे लोकांसाठी असतात. जे थेट लोकांच्या हृदयापर्यंत पोहचतील. लक्ष्मीची गोष्ट लोकांपर्यंत पोहचली आणि तिचं दु:ख त्यांना समजलं तर माझ्यासाठी हेच यश भरपूर आहे. ज्यावेळी लक्ष्मीने मला तिच्या गेटअपमध्ये पाहिलं तेव्हा तिची प्रतिक्रियाच माझ्यासाठी खूप काही होती. ती म्हणाली की, दीपिका दीदी तू तर माझ्यासारखीच दिसत आहेस. यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट काय असू शकते. तुम्ही ज्याचे भूमिका पडद्यावर साकारता आहात ती व्यक्ती तुमच्या कामावर समाधानी आहे हीच कामाची मोठी पोचपावती आहे.
दीपिकाला तिच्या लग्नानंतर आयुष्यात काही बदल झाले का असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली की, माझ्या लग्नानंतर पर्सनल आणि प्रोफेशनल या दोन्हीत काही बदल झाला नाही. कारण माझ्या सासरी मला सून म्हणून नाही तर मुलीसारखं वागवलं जातं. लग्नाआधी जेव्हा सुनांच्या छळाच्या गोष्टी ऐकायला मिळत तेव्हा भीती वाटत होती. पण मी नशिबवान आहे ज्या घरी मी आले तिथं मुलगी आणि सुनेत भेदभाव केला जात नाही. यामुळे आईसुद्धा माझी जास्त काळजी करत नाही. माझ्या अनुभवावरून एक गोष्ट खात्रीने सांगू शकते की प्रत्येक कुटुंब एकसारखं नसतं.
कामात बराच वेळ जात असल्यानं घरी जाण्यास उशीर होतो तेव्हा आपल्याला सासऱ्यांकडून ओरडा खावा लागतो असंही दीपिकाने सांगितलं. ती म्हणाली, माझे सासरे मला दरडावून विचारतात की, तू कसली मुलगी आहेस आमच्यासाठी वेळ काढू शकत नाहीस. खरंतर त्यांचे ओरडणे हे माझ्या वडिलांप्रमाणेच असतं. सासरे जितकं रणवीरची बहिण रीतिकावर प्रेम करतात तितकंच ते माझ्यावरही करतात. सून आणि मुलगी यात कोणताही फरक करत नाहीत.