मुंबई, 14 ऑगस्ट : टोकियोमध्ये झालेल्या यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंग (Weightlifting) अर्थात भारोत्तोलन या क्रीडाप्रकारात भारतासाठी रौप्यपदक जिंकून साईकोम मीराबाई चानू (Saikhom Mirabai Chanu) हिने ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर संपूर्ण देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होतो आहे. एका दुर्गम राज्यातल्या मुलीने मिळवलेल्या या यशामुळे भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. एवढं मोठं यश मिळवल्यानंतरही तिची राहणी किती साधी आहे, याची प्रचीती गेल्या काही दिवसांत व्हायरल झालेल्या तिच्या फोटोवरूनही सर्वांना आली. त्यात अगदी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जमिनीवर बसून जेवताना दिसत आहे. दरम्यान, डान्स दीवाने या कलर्स चॅनेलवरच्या रिअॅलिटी शोच्या स्वातंत्र्यदिन विशेष भागात ती नुकतीच सहभागी झाली होती. त्या वेळी आपली खडतर वाटचाल आठवून मीराबाईला अश्रू आवरले नाहीत. माधुरी दीक्षितही (Madhuri Dixit) त्या वेळी भावूक झाली, असं या कार्यक्रमाच्या एका प्रोमो क्लिपमध्ये दिसत आहे. 'दैनिक जागरण'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
कलर्स टीव्ही चॅनेलवर शनिवारी आणि रविवारी रात्री आठ वाजता डान्स दीवाने (Dance Deewane) हा रिअॅलिटी शो (Reality Show) लागतो. या वीकेंडला स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं (Independence Day Special Episode) आयोजन करण्यात आलं आहे. त्यात रौप्यपदक विजेती साईकोम मीराबाई चानू हिला विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं. तसंच, भारताच्या क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, त्यासोबतच भवानीदेवी आणि पहिलवान प्रिया मलिक आदी मान्यवरदेखील या विशेष भागात सहभागी झाले आहेत.
हे ही वाचा-घरी परताच रडू लागली भारतीय खेळाडू, कारण समजल्यावर सर्वांना अश्रू अनावर
View this post on Instagram
या विशेष भागाच्या प्रोमो क्लिप्स सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत. त्यात मीराबाईच्या खडतर वाटचालीचं दर्शन घडवणारं विशेष सादरीकरण काही कलाकारांनी केलं. ते पाहून मीराबाईला अश्रू आवरले नाहीत. आपल्या वाटचालीत आलेले अडथळे, त्यावर जिद्दीने केलेली मात आणि रौप्यपदक मिळवण्यात आलेलं यश या साऱ्या प्रवासाचा पट तिच्या डोळ्यांसमोर तरळला आणि तिला रडू आलं. ती इतकी भावूक झाली होती, की शोची होस्ट भारती सिंह हिने तिला जाऊन सावरलं. हे सारं ऐकताना परीक्षक असलेल्या माधुरी दीक्षित हिलाही अश्रू आवरले नाहीत. पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या एका जवानाच्या विधवा पत्नीवर आधारित असलेलं एक सादरीकरण पाहतानाही मीराबाईच्या डोळ्यांत अश्रू आले.
या कार्यक्रमात मीराबाईला एक सरप्राइजही देण्यात आलं. एका मुलाखतीत मीराबाईला विचारण्यात आलं होतं, की ऑलिम्पिकनंतर ती सर्वांत जास्त कोणती गोष्ट मिस करतेय? त्यावर तिने 'पिझ्झा' असं उत्तर दिलं होतं. हे लक्षात ठेवून कार्यक्रमात तिच्यासाठी खास पिझ्झा मागवण्यात आला होता. स्पर्धकांसोबत तिने पिझ्झा खाण्याचा आनंद लुटला.
View this post on Instagram
'डान्स दीवाने या कार्यक्रमात मला बोलावल्याबद्दल मी खूप खूश झाले आहे. या शोमध्ये मी कधी येऊ शकेन आणि माधुरी दीक्षित यांना भेटू शकेन असं मला वाटलं नव्हतं. मला नृत्य करणंही आवडतं. डान्स दीवाने टीमने दिलेलं सरप्राइज मला आवडलं,' अशा शब्दांत मीराबाई चानू हिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
'पिझ्झा खाताना मला खूप मजा आली. स्पर्धकांना देण्यासाठी माझ्याकडे एकच संदेश आहे. तो म्हणजे काहीही करायचं असेल, तर सर्वोत्तम कामगिरी करण्यावरच भर दिला पाहिजे. खूप मेहनत केली, तर फळ नक्की मिळतं. असेच कष्ट करत राहा आणि भारताचं नाव उज्ज्वल करत राहा,' असं मीराबाईने सांगितलं.
गुंजन ही आपल्या आवडीची खेळाडू असल्याचं आणि तिचे सगळे परफॉर्मन्स आपण पाहत असल्याचंही मीराबाईने नमूद केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.