कोल्हापूर, 30 ऑक्टोबर : दख्खनचा राजा जोतिबाचं (dakkhancha raja jotiba) महात्म्य दाखवणारी दख्खनचा राजा जोतिबा ही मालिका वादात सापडली आहे. या मालिकेत चुकीची माहिती दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मालिकेच्या कथानकावर आक्षेप घेत मालिका बंद करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. मालिकेविरोधात निदर्शनंही करण्यात आली.
23 ऑक्टोबरपासून दख्खनचा राजा जोतिबा ही मालिका मराठी चॅनेलवर प्रक्षेपित झाली. आठवड्याभरातच ती वादात अडकली. मालिकेत चुकीचा इतिहास दाखवत भक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत ही मालिका तातडीने बंद करावी अशी मागणी करण्यात येत आहे. मालिकेविरोधात गुरव समाजातील पुजाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी मंदिरासमोर निदर्शनं केली.
महेश कोठारे निर्मित कोठारे प्रोडक्शनची ही मालिका आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी ज्योतिबाची महती घराघरात पोहोचेल म्हणून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला होता. मटाच्या वृत्तानुसार या मालिकेत चुकीची माहिती दाखवली जाणार नाही, पुजाऱ्याकडून योग्य ती माहिती घेतली जाईल, असा शब्द निर्माते महेश कोठारे यांनी दिली होता. मात्र मालिका सुरू झाल्यानंतर ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. आता जी मालिका दाखवली जात आहे, त्यात अनेक चुकीच्या घटना आहेत, चुकीची माहिती सादर केली जाते आहे. असा आरोप गुरव समाजातील पुजाऱ्यांनी केला आहे.
हे वाचा - खण साडी आणि खण ड्रेस; मराठमोठ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहून म्हणाल लय भारी!
या मालिकेत अनेक चुकीच्या गोष्टी दाखविल्या असून ही मालिका बंद करावी अशी मागणीही होऊ लागली आहे. चुकीची माहिती दाखवून भावना दुखावल्याने आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरपंच राधाताई बुणे यांना निवेदन दिलं आहे. सत्यकथा दाखवा अन्यथा मालिका बंद करा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. कोठारे प्रोडक्शनवर कारवाई करा अशी मागणी गुरव समाजाने केली आहे. मालिकेची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून गुन्हा नोंद करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
हे वाचा - अंकिता लोखंडेला जुन्या साड्या पाहून आली सुशांतबरोबर केलेल्या त्या मालिकेची आठवण
या मालिकेचे चित्रीकरण कोल्हापुरात सुरू आहे. त्यासाठी कोल्हापुरातील चित्रनगरीमध्ये मोठा सेट उभारण्यात आला आहे.