'कोर्ट'मधील लोकशाहीर काळाच्या पडद्याआड, वीरा साथीदार यांचा कोरोनामुळे झाला मृत्यू

'कोर्ट'मधील लोकशाहीर काळाच्या पडद्याआड, वीरा साथीदार यांचा कोरोनामुळे झाला मृत्यू

ज्येष्ठ विचारवंत, अभिनेते आणि लेखक म्हणून प्रसिद्ध असणारे वीरा साथीदार (Vira Sathidar) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.

  • Share this:

नागपूर, 13 एप्रिल: ज्येष्ठ विचारवंत, अभिनेते आणि लेखक म्हणून प्रसिद्ध असणारे वीरा साथीदार (Vira Sathidar) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी रात्री उशिरा वीरा साथीदार यांची प्राणज्योत मालवली. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. वीरा साथीदार यांची 'कोर्ट' (Court Movie) सिनेमातील भूमिका विशेष गाजली होती. चैतन्य ताम्हाणे (Chaitanya Tamhane)दिग्दर्शित या मराठी सिनेमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाची मोहोर उमटवली होती. त्यामध्ये वीरा साथीदार यांनी लोकशाहीर नारायण कांबळे ही मुख्य भूमिका बजावली होती.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या 'कोर्ट' सिनेमातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं काम त्यावेळी नावाजलं गेलं होतं. 62 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ला ‘सुवर्णकमळा’चा सर्वोच्च बहुमान देखील मिळाला होता. देशविदेशातील विविध महोत्सवांमध्ये या सिनेमाची वाहवा झाली होती. साथीदार यांच्या सहज अभिनयाची तर सर्वत्र चर्चा झाली. ऑस्करच्या ‘बेस्ट फॉरेन फिल्म’ या विभागासाठी ‘कोर्ट’ या सिनेमाची निवड करण्यात आली होती. वीरा साथीदार यांच्याकडे आंबेडकरी चळवळीचा आधारस्तंभ म्हणून पाहिले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. त्यांनी आंबेडकर चळवळीतील अनेक गाणी देखील गायली आहेत.

(हे  वाचा-Ground Report: 'ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो', वसई-विरारचं भीषण वास्तव)

वीरा साथीदार हे मुळचे वर्ध्यातील होते, मात्र नागपूरच्या जोगीनगर झोपडपट्टीत त्यांचं बालपण गेलं. आईने त्यांना जिद्दीने शिक्षणाची गोडी लावली. त्यांचे वडील नागपूरच्या रेल्वे स्थानकावर हमाली करायचे तर आई बांधकाम मजूर होती. या परिस्थितीतही त्यांनी अभिनेता, लेखक, विचारवंत, समाजसेवक, गीतकार, पत्रकार इथपर्यंत मजल मारली. त्यांनी ‘विद्रोही’ नावाच्या मासिकाचे संपादन देखील केले आहे. साथीदार हे ‘रिपब्लिकन पँथर’ संघटनेच्या माध्यमातून वंचितांसाठी काम करायचे. त्यांच्या जाण्याने त्यांचे सहकलाकार, त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

 

Published by: Janhavi Bhatkar
First published: April 13, 2021, 11:13 AM IST
Tags:

ताज्या बातम्या