मुंबई, 31 ऑगस्ट ः अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर (rhea chakraborty) अनेक आरोप लावण्यात आले आहेत, संशयाची सुई रियाकडेच आहे. अशात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येते आहे ती म्हणजे, रिया चक्रवर्ती रुग्णालयाच्या परवानगीशिवायच सुशांतच्या मृतदेहाजवळ गेली होती.
सुशांतचा मृतदेह कुपर रुग्णालयात (cooper hospital) नेण्यात आला होता. तेव्हा सुशांतचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी रिया कुपर रुग्णालयात गेली होती. रुग्णालयातील कर्मचाऱ्यानेच याबाबत एका वृत्तसंस्थेला माहिती दिली होती. दरम्यान याप्रकरणी महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाने कुपर रुग्णालयाला नोटीस पाठवली होती. याबाबत उत्तर देताना रुग्णालयाने आपण रियाला अधिकृत परवानगी दिली नसल्याचं सांगितलं आहे.
कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकिन गुज्जर यांनी महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाला सांगितलं की, "सुशांतचा मृतदेह पाहण्यासाठी रिया चक्रवर्ती कशी पोहोचली याची अधिकृत माहिती आमच्याकडे नाही. रुग्णालयामार्फतही रियाला यासाठी अधिकृत परवानगी देण्यात आली नव्हती"
हे वाचा - SSR Case: आज रियाचा आणखी एक धक्कादायक चॅट उघड, CBI चौकशीत झाला मोठा खुलासा
डॉ. गुज्जर यांनी हा तोंडी जबाब दिला आहे. आयोगाने त्यांना हा लिखित स्वरूपात देण्यास सांगितला आहे. दरम्यान त्यांना पुन्हा 7 सप्टेंबर रोजी आयोगाने बोलावलं आहे.
14 जून रोजी मुंबईतल्या राहत्या घरात सुशांतचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. सुशांतला पाहण्यासाठी रियादेखील रुग्णालयात पोहोचली. सुशांतचे कुटुंबीय आणि मित्र परिवार अंत्यविधीमध्ये सहभागी होऊ देणार नाहीत म्हणून एकदा सुशांतला शेवटचं पाहू दे अशी विनंती रियानं कर्मचाऱ्याला विनंती केली होती.
हे वाचा - सुशांतबद्दल 'तो' प्रश्न विचारताच रिया भडकली? CBI चौकशीत महत्त्वाची घडामोड
रुग्णालयातील कर्मचारी सुजीत सिंह राठोड यांनी रियाला सुशांच्या मृतदेहाजवळ शेवटचं पाहण्यासाठी 5 मिनिटं घेऊन गेल्याचं 'एबीपी न्यूज'नं दिलेल्या वृत्तात सांगितलं होतं. सुजीत म्हणाले, मी स्वत: रियाला सुशांतच्या मृतदेहाजवळ घेऊन गेलो होतो. रिया यावेळी अत्यंत भावुक झाली होती. तिला अश्रू अनावर झाले होते आणि तिने सुशांतचा हात धरून केवळ 'सॉरी बाबू' एवढे शब्द उच्चारले. 5 मिनिटं रिया तिथे होती. त्यानंतर मी तिला बाहेर घेऊन आल्याचं सुजीत सांगतात.