मुंबई, 24 डिसेंबर: 'कौन बनेगा करोड़पती' (Kaun Banega Crorepati) हा कार्यक्रम गेली अनेक वर्षं लोकांचं मनोरंजन करत आहे. महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सूत्रसंचालनामुळे तो एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. या कार्यक्रमातील प्रश्नांची उत्तरं देऊन लाखो रुपये जिंकायला स्पर्धक येतात. अमिताभ स्पर्धकाला विचारतात एवढी मोठी रक्कम जिंकल्यावर काय करणार? मग स्पर्धकही उत्तरं देतात. पण तुम्हाला माहिती आहे का? की, स्पर्धकाने जिंकलेल्या रकमेतून कर कापला जात असल्यामुळे त्याला जिंकलेली पूर्ण रक्कम मिळतच नाही. चला तर मग जाणून घेऊया कौन बनेगा करोडपतीमध्ये पैसे जिंकणाऱ्या व्यक्तीला किती रुपये कर भरावा लागतो आणि किती रुपये त्याच्या हातात पडतात.
कायद्यानुसार कर बसतो
केबीसीमध्ये जिंकलेली रक्कम स्पर्धकाच्या उत्पन्नाचा स्रोत आहे त्यामुळे त्यावर प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 56 (2)(ib) नुसार गेम शो, जुगार, सट्टा किंवा लॉटरीत जिंकलेल्या रकमेवर कर भरावा लागतो.
एक कोटी रुपयांवर किती कर भरावा लागेल?
प्राप्तिकर कायद्याच्या कलम 194b नुसार कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात 1 कोटी रुपये जिंकणाऱ्या स्पर्धकाला एकूण रकमेच्या 30 टक्के म्हणजे 30 लाख रुपये कर भरावा लागतो. त्याउपर 30 लाखांवर 10 टक्के सरचार्ज म्हणजे 3 लाख रुपये द्यावे लागतात. तसंच 30 लाखांवर 4 टक्के सेस द्यावा लागतो तो 1.2 लाख रुपये होतो. म्हणजे केबीसीत 1 कोटी रुपये जिंकणारा स्पर्धक 34.5 लाख रुपयांचा कर भरून सुमारे 65 लाख रुपये घरी घेऊन जाऊ शकतो. या कार्यक्रमात 10 हजार जिंकणाऱ्या व्यक्तीलाही कर भरावाच लागतो.