मुंबई, २८ मार्च- कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेने नुकतेच १५० भाग पूर्ण केले. मालिका सुरु होण्याआधीपासूनच मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मृणाल आणि शशांकची जोडी प्रेक्षकांना भेटायला आली. तसेच मृणालचे छोट्या पडद्यावर कमबॅकदेखील झाले. वंदना गुप्ते, प्रदीप पटवर्धन, शर्मिष्ठा राउत हे कलाकार मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. मंदार देवस्थळी दिग्दर्शित या मालिकेने प्रेक्षकांना आपलंसं करून बघता बघता तब्बल १५० भागांचा पल्ला गाठला.
या निमित्ताने मृणालने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शशांक आणि तिचा एक फोटो पोस्ट केला. मालिकेने १५० भाग पूर्ण केले याबद्दल बोलताना अनु म्हणजेच मृणाल दुसानिस म्हणाली, “सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही मालिका करतानाचा प्रवास अप्रतिम आहे. आम्ही खूप मेहेनत घेतो आणि मजाही करतो. आमची सेटवर खूप छान टीम तयार झाली आहे. १५० भाग पूर्ण झाले यावर विश्वास बसत नाहीये. खरं सांगायचं तर अनु ही भूमिका माझ्या खुपचं जवळची भूमिका आहे. मी आजवर साकारलेल्या सगळ्याच भूमिका मला प्रिय आहेत आणि महत्वाच्या वाटतात पण, अनु मला जवळची वाटते कारण, ती खूप खंबीर आहे, स्वावलंबी आहे आणि माझ्यासारखी आहे”. प्रेक्षकांनी आम्हांवर भरभरून प्रेम केलं आहे यापुढे देखील असचं करत रहा, इतकचं सांगेन.”
आता मालिकेमध्ये प्रेक्षकांना बऱ्याच घटना पाहायला मिळणार आहेत. अनु आणि सिद्धार्थमध्ये पुन्हा मैत्री झाली असून दुर्गाला ही मैत्री खटकत आहे. आता यांची मैत्री पुन्हा तोडण्यासाठी ती कुठलं नवं कारस्थान रचेल? तसेच सिद्धार्थ आणि अनु यांची मैत्री ती तोडू शकेल का ? हे पाहणं रंजक असणार आहे.
VIDEO स्कूटर अपघात पाहून राहुल गांधींनी थांबवला ताफा; जखमी पत्रकाराला स्वतःच्या कारमधून नेलं रुग्णालयात