गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचं निधन

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचं निधन

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरीताई आमोणकर यांचं निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • Share this:

04 एप्रिल :  आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने गेल्या सहा दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका 'गानसरस्वती' किशोरीताई आमोणकर यांचं निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रावर एकच शोककळा पसरली.

किशोरीताई जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका होत्या. प्रभादेवीतील राहत्या घरी रात्री अकराच्या सुमारास त्यांचे झोपेतच निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे दोन मुलगे, सुना आणि नातवंडे आहेत. त्यांची नात तेजश्री आमोणकर हिने त्यांचा वारसा जपला आहे. किशोरीताईंचे पार्थिव सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रवींद्र नाट्यमंदिर संकुलात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून संध्याकाळी दादर चौपाटी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शास्त्रीय गायनातला ख्याल प्रकार हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. ठुमरी आणि भजन या संगीताच्या प्रकारातही त्यांनी अधिराज्य गाजवलं. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1932 साली झाला.  त्यांच्या पहिल्या गुरू म्हणजे त्यांच्या आई मोगुबाई कुर्डीकर... त्या जयपूर घराण्याच्या होत्या.. त्यानंतर त्यांना भेंडीबाजार घराण्याच्या अंजनीबाई मालपेकर यांच्याकडूनही संगीताचं धडे मिळाले. पण किशोरीताई कधीच एका पठडीत किंवा प्रकारात अडकून पडल्या नाहीत.. नवनवे प्रयोग करणं, आपली स्वतःची शैली निर्माण करणं, ही त्यांची खासियत होती..

जयपूर घराण्यातही त्यांनी अनेक प्रयोग केले, त्याच्या कक्षा रुंदावल्या, इतर घराण्यांची शेलीही त्यांनी आत्मसात केली. संगीत क्षेत्रातलं एक महान विद्यापीठ असं त्यांना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

1964 साली त्यांनी गीत गाया पत्थरों ने या हिंदी चित्रपटासाठीही पार्श्वगायन केलं. पण हिंदी चित्रपटसृष्टीचा अनुभव फार काही चांगला नव्हता, आणि त्यांना ती मानवलीही नाही. त्या पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळल्या.

कडक शिस्तीसाठी त्या जाणल्या जायच्या.. कार्यक्रमात गाताना त्यांना चेहऱ्यावर प्रखर प्रकाश चालायचा नाही. मोठमोठे लाईटस् डोळ्यावर आले की मी माझ्या कलेशी एकरूप होऊ शकत नाही, असं त्या म्हणायच्या. त्यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्रात एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. IBN लोकमतची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

First Published: Apr 4, 2017 08:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading