ड्रग्ज प्रकरणात आणखी एक अभिनेत्री अडचणीत, सेंट्रल क्राइम ब्रँचचा घरावर छापा

ड्रग्ज प्रकरणात आणखी एक अभिनेत्री अडचणीत, सेंट्रल क्राइम ब्रँचचा घरावर छापा

बंगळुरूतील ड्रग प्रकरणाची पाळंमुळं कन्नड सिनेसृष्टीतही आणखी खोलवर जाऊ लागली आहे. याप्रकरणी आणखी एक अभिनेत्री अडचणीत आली आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 08 सप्टेंबर : बंगळुरूतील ड्रग प्रकरणाची पाळंमुळं कन्नड सिनेसृष्टीतही आणखी खोलवर जाऊ लागली आहे. याप्रकरणी आणखी एक अभिनेत्री अडचणीत आली आहे. न्यायालयाकडून वॉरंट प्राप्त झाल्यानंतर, अभिनेत्री संजना गलरानीच्या बेंगळुरूमधील घरात सेंट्रल क्राइम ब्रँच (Central Crime Branch CCB) ड्रग्ज प्रकरणात झाडाझडती घेण्यात आली. मंगळवारी याबाबत संयुक्त सीपी गुन्हे, संदीप पाटील यांनी माहिती दिली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

सोमवारी ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले, ज्यानुसार तिला 5 दिवसांच्या कोठडीमध्ये पाठवण्यात आले आहे.  बेंगळुरू पोलिसांनी शुक्रवारी अशी माहिती दिली होती की, ड्रग प्रकरणातील सहभागामुळे कन्नड अभिनेत्री रागिणी द्विवेदीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान 'रागिणी द्विवेदीला अटक करून तिला ताब्यात घेण्यात आले आहे', अशी माहिती पाटील यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये दिली आहे.

(हे वाचा-सिनेसृष्टीला मोठा धक्का, तेलुगू अभिनेता जयप्रकाश रेड्डी काळाच्या पडद्याआड)

दरम्यान याप्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. विशेष म्हणजे, काही आठवड्यांपूर्वी कन्नड चित्रपट निर्माते इंद्रजित लंकेश सीसीबीसमोर हजर झाले होते आणि त्यांनी कन्नड चित्रपटसृष्टीत ड्रग्सच्या वापराविषयी माहिती उघड केली होती.

(हे वाचा-SSR case : 'मुंबई पोलिसांचा तपास सुरूच राहावा, यासाठी रियाने केली खोटी तक्रार')

रागिणीव्यतिरिक्त अटक करण्यात आलेल्यांची नावे राहुल आणि विरेन खन्ना अशी आहेत. त्याआधी गुरुवारी रविशंकर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 4 जणांना अटक करण्यात आली आहे. रागिणीच्या घरावर सीसीबीने शुक्रवारी छापा टाकला होता. आता संजना गलरानीच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पाळंमुळं आणखी खोलवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रागिणीच्या अटकेनंतर संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या प्रकरणात खन्ना मुख्य आहे जो मोठ्या पार्ट्यांचे आयोजन करत असे आणि त्यामध्ये ड्रग्ज उपलब्ध करून देत असे. तो दिल्लीमध्ये होता आणि सीसीबीचे दोन पोलीस निरिक्षक त्याला अटक करण्यासाठी गेले होते आणि त्यांनी त्याला अटक केली आहे.'

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 8, 2020, 10:41 AM IST

ताज्या बातम्या