मुंबई, 14 जून- बॉलिवूड सेलिब्रिटी अनेकदा त्यांच्या चाहत्यांच्या गराड्यात अडकतात. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे ते मनमोकळेपणाने फिरू शकत नाहीत. सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातच त्यांना फिरावं लागतं. त्यांचं खासगी आयुष्यही अनेकदा लोकांच्या समोर येतं. उरी फेम विकी कौशलसोबतही काहीसं असंच झालं. पण यावेळी एका चाहतीने त्याच्या प्रायव्हसीचा विचार केला. त्याचं झालं असं की, विकी एका कॅफेमध्ये बसला होता. तेव्हा त्याच्या चाहतीने त्याला पाहिले. आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहूनही ती विकीकडे गेली नाही. विकी तिच्या टेबलच्या बाजूच्याच टेबलवर बसला होता. त्या महिलेने विकीच्या प्रायव्हसीचा विचार करत त्याला एकांत देणं योग्य समजलं.
महिलेच्या नवऱ्याने ट्विटरवर विकीला घडलेली घटना सांगितली. त्याने लिहिले की, ‘माझ्या पत्नीने आज आपल्या सर्वात आवडत्या अभिनेत्याला विकी कौशलला जॅम जॅम कॅफेमध्ये पाहिलं. तो माझ्या पत्नीच्या बाजूच्या टेबलवर बसला होता. पण माझ्या पत्नीचं लाजेने त्याच्याशी बोलणं झालं नाही. याशिवाय विकी एक स्टार आहे तर त्याला त्याचा निवांतपणा मिळायला हवा म्हणून ती बोलायला गेली नाही.’ आपल्या चाहत्याचा हा प्रांजळपणा विकीला आवडला. त्याने या ट्वीटला उत्तर देत म्हटलं की, ‘माझ्या प्रायव्हसीची काळजी केल्याबद्दल धन्यवाद. पुढच्यावेळी बेधडकपणे माझ्याशी बोलायला या. मलाही तुमच्याशी बोलायला आवडेल.’ विकीच्या या उत्तराने त्याचे इतर चाहतेही भलतेच खुश झाले. या दोघांचं हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विकीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच तो सरदार ऊधम सिंह या बायोपिकमध्ये दिसणार आहे. शूजीत सरकार या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय विकी भूत या भयपटातही दिसणार आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं.
VIDEO : नानांना क्लीन चिट; तनुश्री म्हणते, पोलीसच भ्रष्टाचारी!