मुंबई, 18 डिसेंबर: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केल्यानंतर बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं होतं. या प्रकरणात आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची नावं आली आहेत तर अनेकांना समन्सही बजावण्यात आला आहे. अलिकडेच NCB कडे केलेल्या एका तक्रारीनंतर या प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलं आहे. निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 2019 साली दिग्दर्शक करण जोहर यांच्या घरी झालेल्या पार्टीत अंमली पदार्थाचा वापर केला गेला होता, असा आरोप आहे. त्यामुळं आता करण जोहरही या ड्रग्सप्रकरणात ओढला जाण्याची शक्यता आहे.
2019 साली करण जोहर यांच्या घरी झालेल्या पार्टीसंबंधित काही कागदपत्रं आणि व्हिडिओ NCB च्या हाती लागली आहेत. या मिळालेल्या व्हिडिओ आणि कागदपत्रांची छाननी सुरू आहे. त्यामुळे यात काही आक्षेपार्ह आढळलं तर करण जोहरच्या अडचणींत वाढ होऊ शकते.
याप्रकरणी NCB चे संचालक समीर वानखेडे यांनी सांगितलं, की करण जोहर यांची गरज असेल तेव्हा त्यांना चौकशीसाठी बोलावून घेऊ. त्यांनी पुढे सांगितल की, करण जोहर यांच्या घरी 2019 साली एक पार्टी झाली होती. त्या पार्टीत बॉलीवूडच्या मोठं मोठ्या कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. या पार्टीत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा वापर करण्यात आला होता, अशी तक्रार एनसीबीकडे मंजींदरसिंग सिरसा यांनी केली आहे. ते सिरोमनी अकाली दलचे माजी आमदार आहेत.
सध्या NCBने मंजींदरसिंग सिरसा यांच्या तक्रारीवरून संबंधित प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. तसेच संबंधित व्हिडिओ उपस्थित असणाऱ्या बहुतांशी सर्व कलाकारांना चौकशीसाठी बोलावलं जाईल असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पण त्याआधी करण जोहर यांनी दिलेल्या पुराव्यांची छाननी सुरु आहे, असंही या अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. त्यामुळं याप्रकरणात आणखी काय समोर यईल हे पाहणं महत्त्वाचं आहे.