नवी दिल्ली, 01 जुलै : जगातील सर्वात मोठ्या चित्रपट पुरस्कारांपैकी एक म्हणजे ऑस्कर (oscar) आणि हा पुरस्कार देणाऱ्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेजने अभिनेता ऋतिक रोशन (hrithik roshan) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. जर या दोघांनीही निमंत्रण स्वीकारलं तर पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांसाठी त्यांना मतदान करण्याचा अधिकार मिळेल. 25 एप्रिल, 2021 ला ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
अकादमीने 819 जणांची यादी जारी केली आहे. यामध्ये ऋतिक आणि आलिया या दोघांच्या नावाचा समावेश आहे. आलिया भट्टचा गली बॉय हा चित्रपटही विदेशी भाषा श्रेणीसाठी भारतामार्फत पाठवण्यात आला होता. मात्र या चित्रपटाला नामांकन मिळालं नाही. आता अकादमीने जारी केलेल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये आलियाच्या राजी आणि गली बॉय या चित्रपटाचा उल्लेख करण्यात आला आहे. तर ऋतिक रोशनच्या सुपर 30 आणि जोधा अकबर याचा उल्लेख केला आहे.
जावेरी यांनी ट्विट केलं आहे की, "ऋतिक आणि आलिया दोघंही प्रतिभाशाली सुपर स्टार्स आहेत आणि अकादमीला ते चांगली सेवा देतील"
आलिया आणि ऋतिक यांच्याशिवाय फिल्म निर्माते निष्ठा जैन आणि अमित मधेशिया, डिझाइनर नीता लुल्ला, कास्टिंग डायरेक्टर नंदिनी श्रीकांत, व्हिज्युअल इफेक्ट्स सुपरवाइजर विशाल आनंद आणि संदीप कमल यांचाही समावेश आहे.
अकादमीचे अध्यक्ष डेव्हिड रुबिन म्हणाले की, अकॅडमी मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेजमध्ये या सर्व प्रतिष्ठीत लोकांना आमंत्रित करून आम्हाला खूप आनंद होतो आहे.