बालाघाट, 28 नोव्हेंबर: एखाद्या मंत्र्यांच्या मर्जीविरोधात गेल्यानं काय अडणींचा सामना करावा लागतो याचा अनुभव नुकताच अभिनेत्री विद्या बालनने (Vidya Balan) घेतला आहे. विद्याच्या 'शेरनी' सिनेमाचं शूटिंग काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये सुरू होतं. त्यादरम्यान अभिनेत्रीची आणि मध्य प्रदेशच्या वनमंत्र्यांची भेट झाली. वनमंत्री विजय शाह यांनी तिला रात्रीच्या जेवणाचं आमंत्रण दिलं पण तिला कामामुळे ते शक्य नसल्याने तिने नकार दिला. त्यानंतर विद्याच्या शूटिंगदरम्यान काही अडचणी आल्या.
नेमका प्रकार काय?
बालाघाटमध्ये विद्याच्या शेरनी या चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरू होतं. शूटिंगसाठी 20 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबरदरम्यान रितसर परवानगी मिळाली होती. त्यादरम्यान मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांनी विद्या बालनला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. भेटीसाठी 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 अशी वेळ निश्चित करण्यात आली होती. यानंतर, वनमंत्री सायंकाळी चार वाजता महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जाणार होते. तिथे त्यांना रात्रीचा मुक्काम करायचा होता, परंतु तो भरवेली खाणीच्या विश्रामगृहात वनमंत्री थांबले.
अखेर विद्या आणि वनमंत्र्यांची भेट संध्याकाळी 5 वाजता झाली. त्यांनी विद्याला रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रण दिलं. पण विद्या त्यावेळी महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने तिने नकार दिला. याचा परिणाम विद्याच्या शूटिंगवर झाला असा आरोप करण्यात येत आहे. दुसर्या दिवशी जेव्हा चित्रपटाचं यूनिट नेहमीप्रमाणे शूटिंगसाठी निघाले होते तेव्हा त्यांच्या गाड्या रोखण्यात आल्या. त्यांना शूटिंगची परवानगी नाकारण्यात आली. अखेर मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) नरेंद्र कुमार सनोदिया यांच्या आवाहनानंतर शूटिंगला सुरुवात झाली.
मंत्र्यांचं स्पष्टीकरण काय?
शूटिंगसाठी अडवणूक केल्याच्या प्रकाराबद्दल मध्य प्रदेशच्या वनमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की, ‘त्या दिवशी शूटिंगसाठी जंगलामध्ये प्रमाणापेक्षा जास्त जनरेटर नेण्यात आले होते. म्हणून शूटिंगला परवानगी नाकारली होती. त्यामध्ये इतर कोणताही हेतू नव्हता.’