मुंबई, 19 नोव्हेंबर : बॉलिवूडमध्ये सातत्यानं कलाकारांच्या निधनाच्या बातम्या समोर येत आहेत. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यानंतर कलाकारांना हृदयविकाराचे झटके येत असल्याचं दिसत आहे. अशातच आता प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम गोविल यांनाही हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. तबस्सुम या 78 वर्षांच्या होत्या. कार्डिएक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामायण या प्रसिद्ध मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांच्या या वहिनी होत्या. म्हणजेच त्यांचा भाऊ विजय गोविल यांच्या पत्नी.
तबस्सुम गोविल यांना शुक्रवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांती त्यांचं निधन झालं. रात्री 8.40 वाजता त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला तर 8.42 ला दुसरा झटका आला. ज्यामुळे त्यांचं निधन झालं. आज मुंबईमध्येच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा होशांग गोविल यानं आईचे अंतिम विधी होईपर्यंत तिच्या मृत्यूची माहिती कोणाला दिली नव्हती.
हेही वाचा - हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर देतं रेड अलर्ट; या अवयवांमधून येऊ लागतो जास्त घाम
तबस्सुम यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या अभिनयाला सुरूवात केली. 1947मध्ये आलेल्या 'मेरा सुहाग' या सिनेमात त्यांनी काम केलं. त्यानंतर त्यांनी अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केलं. तसंच अनेक मालिकांमध्ये कामं केली. दूरदर्शनचा देशातील पहिला टॉक शो फूल खिले हैं गुलशन गुलशन तबस्सुम यांनी होस्ट केला होता. 1972 ते 1993 पर्यंत त्या या शोच्या होस्ट म्हणून काम करत होत्या. या कार्यक्रमात त्यांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेण्याची संधी मिळाली होती. तसंच तबस्सुम गोविल या युट्यूबरही होत्या. फिल्म इंडस्ट्रीतील अनसुने किल्ले त्या व्हिडीओकरून सांगत असतं.
तबस्सुम गोविल यांनी 40-50 च्या दशकात अनेक प्रसिद्ध सिनेमात कामं केली. बहार, नरगिस आणि दीदार सारख्या हिट सिनेमांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Heart Attack