नवी दिल्ली, 10 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावरून नेहमीच सामाजिक आणि राजकीय टीका करताना दिसते. बिनधास्तपणे आपलं म्हणणं मांडणाऱ्या स्वराने आता नागरिकता सुधारणा विधेयकाविरुद्ध आवाज उठवला आहे. सोमवारी रात्री लोकसभेत नागरिकता सुधारणा विधेयक 311 मतांनी मंजूर झाल्यानंतर स्वराने मोदी सरकारवर टीका केली आहे.
स्वराने म्हटलं की, भारतात धर्म हा नागरिकत्वाचा आधार नाही. धर्माच्या आधारे भेदभाव होऊ शकत नाही. राज्य धर्माच्या आधारावर निर्णय घेऊ शकत नाही. नागरिकता सुधारणा विधेयकाने मुस्लिमांना बाहेर ठेवलं आहे. NRC/CAB यामधून जिन्नांचा पुनर्जन्म झाला आहे. हॅलो हिंदू पाकिस्तान!
नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं आहे. 311 मतांना हे विधेयक मंजूर झालं आहे. तर विधेयकाच्या विरोधात 80 मतं पडली. काँग्रेसचे नेते शशी थरूर, सेनेचे नेते विनायक राऊत आणि एमआयएमचे नेते असाउद्दीन ओवेसी यांची मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. 80 खासदारांनी या विधेयकांच्या विरोधात मतदान केलं. आता हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी सादर केलं जाणार आहे.
नागरिकत्व सुधारणा विधेयकावर संसदेत सोमवारी वादळी चर्चा झाली. काँग्रेसने आक्रमक धोरण स्वीकारत भाजपवर हल्लाबोल केला. त्यानंतर भाजपचे नेते अमित शहा यांनी उत्तर देत काँग्रेस, शिवसेना आणि तृणमुल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचं धर्मनिरक्षेप असं आहे की, केरळमध्ये मुस्लिम लीग काँग्रेससोबत आहे तर महाराष्ट्रात शिवसेना आहे, असं म्हणत शहा यांनी काँग्रेसना टोला लगावला. तसंच मुस्लिमांसोबत कोणताही द्वेष नाही, हे विधेयक येणारच, असा दावाही शहांनी केला.
अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर देत जोरदार फटकेबाजी केली. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला चुकीचं असल्याचं विरोधकांकडून पसरवण्यात आलं आहे. बरं झालं देशाचं विभाजन हे धर्माच्या आधारावर नाही झालं. जर असं झालं असतं तर हे विधेयक आणण्याची गरज नसती. जी लोकं देशाच्या फाळणीला सामोरं गेली ते कोणत्याही जखमेपेक्षा वेगळं नव्हतं. संसदेला हे स्वीकारावं लागेल की, देशाचं विभाजन हे धर्माच्या आधारावर झालं आहे. ज्या भागात जास्त मुस्लीम राहत होते त्यातून पाकिस्तान तयार झाला तर दुसरा भाग हा भारत तयार झाला, असं शहा यांनी म्हटलं आहे.
याआधीही स्वरा भास्करने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. लोकसभा निवडणुकीवेळी स्वराने मोदी सरकारवर टीका करताना म्हटलं होतं की शेतकऱ्यांची हत्या सरकारने केली आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांमध्ये जेएनयुमधील फी वाढीविरुद्धही तिने विद्यार्थ्यांची बाजू घेतली होती.