मुंबई, 28 डिसेंबर: चित्रपटांपेक्षा वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणारी बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) मुंबईत परतली आहे. रात्री उशिरा तिचं मुंबई विमानतळावर आगमन झालं. तिचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गेल्या वेळी कंगना आली होती तेव्हा तिच्यासाठी झेड सिक्युरिटी देण्यात आली होती. मात्र यावेळी तिची Z सिक्युरिटी काढून घेण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी थलायवी सिनेमाचं शूटिंग पूर्ण करुन कंगना सुट्ट्यांचा आनंद घेत होती. तिच्या हातात सध्या तेजस आणि धाकड असे दोन चित्रपट आहेत. थलायवी आणि तेजस हे तिचे महत्वाकांक्षी प्रोजेक्ट मानले जातात. कंगना मुंबईत आल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपूर्वी कंगना आणि राज्य सरकार यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला होता. कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय बोचरी टीका केली होती. तसंच मुंबईला ‘पाकव्याप्त काश्मीर’ (POK) असंही म्हटलं होतं. कंगनाच्या या वक्तव्यानंतर केवळ सरकारच नाही तर सामान्य मुंबईकरांचं मनही दुखावलं गेलं होतं.
शेतकरी आंदोलनावरुनही पुन्हा ती ट्रोल झाली होती. पंजाबी गायक दिलजीत दोसांझ आणि तिच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलं होतं. प्रियांका चोप्रा, स्वरा भास्कर, मिका सिंग यांच्याविरोधातही कंगनाने काही वक्तव्य केली होती. आता मुंबईत आलेल्या कंगनाचा नक्की कोणाशी सामना होणार? ती मुंबईत येऊन नवा वाद उकरुन काढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.