मुंबई, 6 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या (Enforcement Directorate- ED) रडारवर सापडल्याने या चर्चा सुरु झाल्या होत्या.आता जॅकलिन फर्नांडिस हिला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आणखी एक समन्स पाठवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या समन्सद्वारे तिला 8 डिसेंबरला ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे. जॅकलिन ईडीसमोर हजर होण्याची ही तिसरी वेळ असणार आहे. याआधीही ती दोनदा ईडीच्या चौकशीसा सामोरी गेली आहे.
रविवारी, 5 डिसेंबर रोजी जॅकलिन फर्नांडिस परदेशात जात असताना तिला मुंबई विमानतळावरच रोखण्यात आले. जॅकलीन फर्नांडिसला अंमलबजावणी संचालनालय- ED च्या लुक आउट सर्कुलर (LOC) मुळे मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी परदेशात जाण्यापासून रोखल्याचे समोर आले आहे. ही माहिती ईडीला देण्यात आली होती, त्यानंतर ईडीच्या पथकाने जॅकलिनची चौकशी केली, त्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले.
यापूर्वीही जॅकलिनची ईडीने केली आहे चौकशी
बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकले आहे. याप्रकरणी ईडीच्या पथकाने तिची चौकशीही केली आहे. नुकताच जॅकलीनने ईडीसमोर तिचा जबाब देखील नोंदवला आहे.हे प्रकरण सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे, ज्यांच्यावर मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.23 ऑगस्ट रोजी आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि चित्रपट अभिनेत्री लीना पॉल यांच्या चेन्नई बंगल्यावर अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला होता. ईडीने छापा टाकलेल्या बंगल्याची किंमत करोडो रुपयांमध्ये सांगितली जात आहे. छाप्यादरम्यान कारवाई करत ईडीने मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली होती. यासह, 15 वाहने देखील जप्त करण्यात आली ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. अशा परिस्थितीत ईडी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित प्रकरणात अभिनेत्रीची चौकशी करत आहे. आता जॅकलिनला परदेशात जाण्यापासून ईडीने रोखले आहे.
वाचा : अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन या जोडीमध्ये फूट? एकत्र VIDEO करण्यास दिला नकार
सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्लीच्या रोहिणी कारागृहात बंद
दिल्लीच्या रोहिणी कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरवर एका व्यापाऱ्याकडून एका वर्षात 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. त्याच्यावर खंडणीचे 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत आणि तो कारागृहाच्या आतून रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे.
जॅकलिन मुळची श्रीलंकेची
जॅकलिन मुळची श्रीलंकेची आहे. मात्र बॉलिवूडने तिला ओळख दिली तसेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानची ती जवळची मैत्रीण आहे. तिचे वडील श्रीलंकेचे तर आई मलेशियाची आहे. तिचे वडील संगीतकार तर आई एअर होस्टेस होती. चार भांवडात जॅकलीन सर्वात लहान आहे. जॅकलीन एक मोठी बहीण आणि दोन भाऊ आहेत.
View this post on Instagram
सुकेश चंद्रशेखर कोण आहे ?
मूळचा बेंगळुरू, कर्नाटकातील असलेल्या सुकेश चंद्रशेखरला हाय प्रोफाइल आयुष्य जगायचं होतं. त्यासाठी त्याने हे सर्व प्रकार केले होते. बेंगळुरू पोलिसांनी जेव्हा सुकेशला पहिल्यांदा अटक केली, तेव्हा तो फक्त 17 वर्षांचा होता. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या मुलाचा मित्र बनून त्याने 1.14 कोटींची फसवणूक केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.