विराज मुळे, 22 आॅक्टोबर : साऊथ सुपरस्टार विजयचा मर्सल हा सिनेमा यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाला. मात्र सिनेमा रिलीज होताच तो भलत्याच वादात अडकला. या सिनेमात जीएसटीबाबत असलेल्या काही संवादांना तामिळनाडूतील प्रदेश भाजप नेत्यांनी विरोध केला. त्यामुळे हा सिनेमा रि-सेन्सॉर करण्याची मागणी पुढे आली.
अखेर या वादात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सिनेमाच्या समर्थनार्थ ट्विट केलं. राहुल यांनी लिहिलं की, 'मिस्टर मोदी हा सिनेमा तामिळ संस्कृतीच्या कलेचा आविष्कार आहे. तो तुमच्या प्रतिष्ठेचा विषय करून 'मर्सल'मध्ये विनाकारण लुडबूड करू नका'.
राहुल यांच्या या वक्तव्याचा समाचार घ्यायला भाजप नेतेही मागे हटले नाहीत. त्यांनी लगेचच काँग्रेसला तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे नाही हे दाखवून दिलं.
तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष, तमिलसाई सुंदरराजन म्हणाले, 'आम्ही काही चुकीचं केलेलं नाही, ते तुम्ही केलंय. ज्या तरूणांनी कार्तिक चिदंबरम यांच्याविरूद्ध फेसबुकवर आक्षेपार्ह लिहिलं होतं त्यांची रवानगी तुम्ही जेलमध्ये केली. आणि आज तुम्ही व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारताय.
एकीकडे कमल हसन, दिग्दर्शक पा रंजित यांनी मर्सलला उघडपणे पाठिंबा देत सिनेमा रि-सेन्सॉर करायला विरोध दर्शवला. तर दुसरीकडे मधुर भांडारकरने व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे राहुल 'इंदू सरकार'ला होत असलेल्या विरोधा वेळी कुठे होते असा सवाल उपस्थित केलाय.
हे सारं सुरू असलं तरीही मर्सलला तामिळनाडूत बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळालाय. त्यामुळे वादाचे हे ढग येत्या दिवसात दूर होतात की राजकीय विरोधाला बळी पडून सिनेमा पुन्हा सेन्सॉरच्या कात्रीत अडकतो ते पहायचं.
Mr. Modi, Cinema is a deep expression of Tamil culture and language. Don't try to demon-etise Tamil pride by interfering in Mersal
— Office of RG (@OfficeOfRG) 21 October 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा